Monday, May 4, 2020

रमजानुल मुबारक - ११ *कुरआन ए पाकचा संदेश*






रमजानुल मुबारक - ११
*कुरआन ए पाकचा संदेश*


पवित्र रमजान महिन्याचा दुसरा भाग जो दहा दिवसांवर आधारित आहे,काल संध्याकाळी मगरिब पासून सुरू झाला आहे. याला मगफिरत म्हणजे माफीचा अशरा म्हणतात . (अशरा म्हणजे दहा दिवसांचा कालावधी ) या दहा दिवसांमध्ये अल्लाहतआला आपल्या लाखो भक्तांना माफी देत असतो. या दुनियेतील प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या प्रकारचे अपराध करीत असतो. अपराध किंवा गुन्हे फार मोठे दुष्कृत्ये केल्यानेच होतात असे नव्हे. विनाकारण एखाद्याचे मन दुखावणे हा सुद्धा अपराध आहे. जाणून-बुजून कुणाची तरी निंदानालस्ती करणे हा देखील अपराध आहे. कोणतेही कारण नसताना केवळ  दुसऱ्याला नाव ठेवणे हा सुद्धा अपराध आहे. एखाद्याकडे तिरस्काराने पाहणे हा सुद्धा अपराध आहे.स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी एखाद्याला चुकीचे मार्गदर्शन करणे हा देखील अपराध आहे.असे छोटे-मोठे अनेक अपराध मानवी जीवनात सातत्याने घडत असतात. या सर्व अपराधांपासून सुटका मिळविण्यासाठीच धार्मिक सोपस्कार केले जातात . प्रत्येक धर्मामध्ये धार्मिक कर्मकांड करताना काहीतरी आधार घेतलेला दिसून येतो. धार्मिक कार्यक्रम केल्याने मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते अशी एक सर्वसाधारण धारणा आहे. प्रत्येक धर्माने धार्मिक ग्रंथ वाचन करण्याची शिकवण दिली आहे. कुरआन पठण म्हणजे तीलावत करणे हेसुद्धा रमजान महिन्यातील एकपवित्र कार्य किंवा इबादत (प्रार्थना ) समजली जाते. आपल्याकडे जसे भागवत कथा, नवनाथ पारायण, पोथी वाचन, ज्ञानेश्वरी पारायण केले जाते. त्याचप्रकारे रमजान महिन्यांमध्ये जगभरामध्ये कुरआनशरीफची तिलावत ही केली जाते . सर्व प्रकारच्या पोथ्या वाचनाचा हेतू परमार्थ चिंतन साधून अल्लाह, ईश्वर, भगवंताची आराधना करणे हाच असतो.

विश्‍वनिर्मात्याने ही सृष्टी मानवता (इन्सानियत) धर्मासाठी निर्माण केली . पण मानवाने या मानवतेची विभागणी वेगवेगळे धर्म, जाती, पंथ यामध्ये करून जगभरामध्ये सवते सुबे निर्माण केले . हिंदू-मुस्लीम,इसाई, ज्यू,शीख, जैन असे अनेक धर्म निर्माण झाले. प्रत्येकाने आपल्या पद्धती आपल्या विचारानुसार विकसित केल्या.परंतु या सर्वांमध्ये एक समान धागा म्हणजे कोणत्याही धर्माने इतर धर्मांचा तिरस्कार केला नाही. युरोपमध्ये अनेक ठिकाणी हजरात पैगंबरांनी सांगितलेले कोट्स होर्डिंग रूपाने आजही रस्त्यावर झळकताना दिसतात.ज्या देशांनी चांगले विचार आत्मसात केले ते फार पुढे गेले.पण ज्यांनी अशा विचारांचा स्वीकार केला नाही ते प्रगतीपासून वंचित राहिले . असे जगाचा इतिहास सांगतो . आपला देशही त्याला अपवाद नाही . भारताच्या राज्यघटनेमध्ये सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केला गेला आहे . मात्र राजकीय परिस्थितीमुळे या तत्वांना तिलांजली देण्यासाठी सुद्धा प्रयत्न होताना दिसत आहेत . आपल्या देशासाठी हे प्रगतीचे लक्षण नाही . कुरआन ची शिकवण ही सर्वांसाठी आहे .मानवाच्या विकासासाठी काय केले पाहिजे याचे विश्लेषण त्यामध्ये अल्लाहतआला ने केलेले आहे . गत साडेचौदाशे वर्षाच्या इतिहासामध्ये घडलेल्या अनेक घटनांचा संबंध कुरआनमधील शिकवणीशी संबंधित आहे .म्हणूनच जगभरामध्ये साडेआठ लाखांपेक्षा जास्त वेबसाईटवर कुरआन सर्च केला जातोय . पाश्चिमात्य राष्ट्रे त्यातील सत्य व योग्य गुणांचा स्वीकार करीत आहेत . मानवी कल्याणासाठी सांगितलेल्या कुरआनमधील आदेशांचे पालन होत आहे . आपला ही देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी कुरआनचा पैगाम ( संदेश )समजून घेणे आवश्यक आहे . (क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*9226408082*

स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग, प्रशासन, आणि कंपनी सि.एस.आर च्या माध्यमातून राबविलेला राज्यातील पहिलाच उपक्रम.





कमिन्स इंडिया चे आर्थिक योगदान व नवजीवन संस्थेच्या पुढाकाराने

स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग, प्रशासन, आणि कंपनी सि.एस.आर च्या माध्यमातून राबविलेला राज्यातील पहिलाच उपक्रम.


नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठान हि संस्था १९९४ पासून नाबार्ड बँकेच्या आर्थिक सहकार्याने महाराष्ट्रामधील दुष्काळग्रस्त गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच अनेक देणगीदार संस्था व शासनाच्या विविध विभागामार्फत प्रामुख्याने लोकसहभागातून, शिक्षण, आरोग्य, महिला बचत गटांमार्फत आर्थिक विकास  तसेच अनाथ, निराधार, निराश्रित, एक पालक व उसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालकाश्रम चालवत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या गंभीर दुःखदायी परिस्थितीत संकटाला समाज सेवेची संधी मानून नवजीवन या संस्थेने पुढाकार घेऊन देवनाथ फाउंडेशन, मोहनराव गाडे सामाजिक प्रतिष्ठान तसेच स्थानिक दानशुरांच्या सहकार्याने पाथर्डी येथे दि.26.मार्च रोजी ‘चला करुया अन्नदान अभियानास’  सुरुवात केली.
पाथर्डी नंतर संस्थेने प्रहार संघटना, ‘वारी’ फौंडेशन, शब्दगंध साहित्यिक परिषद, मोहनराव गाडे सामाजिक प्रतिष्ठान, विश्वनिर्मल फौंडेशन, स्त्री शक्ती फौंडेशन, आधार संस्था  या संस्था-संघटनांना एकत्रित करून ‘अहमदनगर सोशल फेडरेशन’ या व्यासपिठाद्वारे कमिन्स इंडिया फौंडेशन च्या आर्थिक सहकार्याने दि.४ एप्रिल पासून नगर MIDC परिसरातील कंपन्या बंद पडल्याने बेरोजगार झालेले कामगार तसेच पोलिसांनी क्वरांटाइन करून ठेवलेले स्थलांतरित मजूर यांचेसाठी अन्नदान अभियान सुरु केले. या अभियानामध्ये शब्दगंध चे राजेंद्र उदागे यांनी सहभागी होऊन दररोज १५० ते २०० याप्रमाणे आजपर्यंत त्यांनी ३५६७ टिफिन दिले. तसेच प्रहार अकादमी व मधुबन ओर्गानिक चे संतोषभाऊ पवार यांनी दररोज १०० याप्रमाणे १८०० टिफिनचे मोठे योगदान दिले. तसेच सबरजिस्ट्रार संजय त्रिंबक साळवे यांनी ५०० टिफिन देऊन सहकार्य केले. याबरोबरच शहरातील ‘Helping Hands’ औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख व त्यांची टीम यांनीही अभियानास मोठा हातभार लावला.
पाथर्डी आणि नगर नंतर कर्जत तालुक्यातील दुष्काळी माहिजळगाव येथे संस्थेने या अभियानास सुरुवात करून आज अखेर १९०० गरजू लोकांना जेवण दिले.
अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक - कमिन्सचे विकास साळवे, आदित्य देसाई, अंजली मगर, संदीप क्षीरसागर, प्रशांत चितळे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख, नवजीवनचे डॉ.श्रीकांत तोडकर, जयेश कांबळे, सौ. अस्मिता साळवे, वारी संस्थेचे सुधीर लंके, देवनाथ फौंडेशनचे डॉ.ज्ञानेश्वर दराडे
अथक परिश्रम – प्रा. दिगंबर गाडे, प्रा.सुनील मरकड, भाग्येश शिंदे, बाळासाहेब चव्हाण, जीतेंद्र आढाव, रवींद्र वायकर, शेखलाल पठाण, प्रथम सोनवणे, राजेंद्र मारकंडे, संपतराव रोहोकले, राजेंद्र भोसले, सुदाम लगड, रवींद्र पवार, संपतराव रोहोकले, सुनील गोसावी
नवजीवन वॉरीयर्सची कामगिरी –
१. प्रा.दिगंबर गाडे - शहारापासून अतीदुर्गम, ज्यांच्या पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत अद्याप पोहोचलेली नाही अशा खेड्यांतील दुर्लक्षित घटकांपर्यंत जाऊन त्यांना अन्नदानाबरोबरच आपल्या जवळ लहान मुलांसाठी चॉकलेट, बिस्किट व खाऊ देत जमलेल्या लोकांना परिसर स्वछता, आरोग्य, शिक्षण, अंधश्रद्धा या विषयी मार्गदर्शन करत आहेत. आजपर्यंत पाथर्डी तालुक्यातील 25 गावांमधील वंचित कुटुंबांपर्यंत  ते पोहोचले आहेत.

२. डॉ.जयेश कांबळे – कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथील गरजवंतापर्यंत अन्नदान करण्याबरोबरच लॉकडाऊन मुळे मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या व्यसनाधीन व्यक्तींचे प्रबोधन करत आहेत.
३. डॉ.श्रीकांत तोडकर – मंत्रालयातील अधिकारी असल्याने आपले नेट्वर्किंग व कार्यकुशलतेचे कौशल्य वापरून सर्व स्वयंसेवकांना या कोरोना युद्धात लढण्यासाठी मानसिक आधार व आर्थिक पाठबळ देतात.
४. राजेंद्र उदागे -  शब्दगंध साहित्यिक परिषद, अहमदनगर केटरर्स, नवजीवन प्रतिष्ठान तसेच जिल्ह्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी असलेले राजूभाऊ उदागे  या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले कि, हा अन्नदान उपक्रम सध्याच्या गंभीर व अडचणीच्या काळात खरोखरच स्तुत्य आहे. या उपक्रमामुळे मला अनेक भुकेलेल्यापर्यंत पोहोचता आले याचे समाधान आहे. या पुढील काळात मी अहमदनगर सोशल फेडरेशन सोबत कार्य करत राहील.
५. संतोष पवार – मुळचे जामखेड येथील राहिवासी व  सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणारे, जिल्ह्यात व राज्यभरात प्रहार संघटनेच्या माध्यमातून अन्याय अत्याचार्याच्या विरोधात खंबीरपणे लढा देणारे मा.संतोषभाऊ पवार या उपक्रमाविषयी म्हणाले कि, अहमदनगर सोशल फेडरेशन च्या माध्यमातून मला या अन्नदान उपक्रमात सहभागी होऊन गरिबांची सेवा करता आली.
पाथर्डी येथे 3792, नगर येथे ११,७३४, माहिजळगाव येथे १९०० असे एकूण १७,४२६ गरजवंतापर्यंत जेवन पोहोचले असल्याचे सांगून कोरोनाशी लढता लढता कोरोनाच्या विषाणूबरोबर जगायला शिकले पाहिजे असे नवजीवनचे राजेंद्र पवार यांनी सांगितले.

रमजानुल मुबारक - १० *रहमत आणि मगफिरत*





रमजानुल मुबारक - १०

*रहमत आणि मगफिरत* 


पवित्र रमजान महिन्याचा रहमत (कृपादृष्टी ) चा कालखंड आज रोजी पूर्ण होत आहे . रमजानचे पहिले दहा दिवस रहमत (कृपा) ,दुसरे दहा दिवस मगफिरत अर्थात (माफी) आणि तिसरे दहा दिवस जहन्नम पासून मुक्तीचा कालावधी म्हणून गणले जातात . कृपादृष्टीचा काळ आज पूर्णत्वास जात आहे .अल्लाहतआला आपल्या भक्तांवर सतत कृपा करीत असतो . त्यांच्या आवाक्या पेक्षा जास्त ओझे तो कधीच त्यांच्यावर टाकत नाही . तो खूप दयालू आहे . भक्तांनी केलेल्या अनेक चुका तो झाकून ठेवीत असतो . तो कधी कुणाची गुपितं उघड करीत नाही.जे लोक इतरांची गुपितं उघड करीत नाहीत अशा भक्तांना तो पसंत करतो .आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे लोक इतरांची गुपित (ऐब) झाकतात . कयामतच्या दिवशी त्यांची गुपितं सुद्धा झाकली जातील . ती अल्लाह शिवाय कोणालाच माहिती होणार नाहीत . हदीस शरीफ नुसार हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि तुम लोगो के ऐबो को छूपाओ,अल्लाहतआला तुम्हारे ऐबो को छुपायेगा .दैनंदिन जीवनामध्ये एकमेकाच्या अनेक गुप्त गोष्टी आपल्याला माहीत असतात. काहीवेळा त्या सांगितल्याने फायदा होतो तर अनेक वेळा नुकसान होते. आपल्या हातून कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.एखादी गोष्ट माहीत झाल्यास तिचा गावभर गवगवा करण्याची सवय असणाऱ्या प्रवृत्ती समाजात असतात.कुणाचे चांगले होणार असेल तर असा गवगवा करण्यास काहीच हरकत नाही. परंतु जर कोणाचे नुकसान होणार असेल तर अश्या वेळी अशा गोष्टीवर पडदा टाकला पाहिजे. असं समाजामध्ये सर्वसाधारणपणे बोलले जाते. समाजाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध झाल्या तरी संयम पाळून सहन कराव्या लागतात.आपल्यामुळे कुणाचा प्रपंच, कुणाची प्रतिष्ठा, इभ्रत, धुळीस मिळणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. हीच शिकवण इस्लाम धर्माने दिली आहे.

मानवाकडून कधी अनावधानाने तर कधी जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या जातात. यामध्ये काही प्रकरणे नाजूक असतात. अशावेळी या गोष्टी जगजाहीर झाल्या तर कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. त्यावेळी अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलून कुणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे .दररोजच्या जीवनामध्ये अनेक प्रसंगांना आपल्याला सामोरे जावे लागते. अशावेळी नेमका कोणता निर्णय घ्यावा हे उमजत नाही. या सर्व गोष्टींबाबतचे मार्गदर्शन कुरआन शरीफ मध्ये केलेले आहे . त्यासाठी कुरआन समजून-उमजून वाचण्याची व समजून घेण्याची आवश्यकता आहे .
रमजान महिन्याचा कृपा दृष्टीचा कालावधी आज संपन्न झाल्यानंतर उद्यापासून मगफिरत( माफी )चा दहा दिवसाचा कालावधी सुरू होणार आहे . याकाळात प्रत्येकाने अल्लाहची माफी मागावी . आपण केलेल्या  सर्व प्रकारच्या कृत्यांसाठी माफी आवश्यक आहे .माफी मागणे आणि माफ करणे यामध्ये सुद्धा अंतर आहे . बदला घेण्यापेक्षा माफ करणारा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो .(क्रमश:)
*सलीमखान पठाण*
*9226408082*

Sunday, May 3, 2020

रमजानुल मुबारक -९ *कुरआन आणि रमजान*k



रमजानुल मुबारक -९ 

*कुरआन आणि रमजान*

पवित्र रमजान महिन्यातील महत्त्वाची घटना म्हणजे कुरआनशरीफ चे पृथ्वीतलावर झालेले अवतरण. अल्लाहतआला, जो समस्त ब्रह्मiड चा रब आहे.जो निसर्ग, पृथ्वी, वातावरण या सर्वांचा मालिक आहे. ज्याला रब्बुल आलमिन म्हटले जाते. तो सर्वांचा आहे. फक्त मुस्लिमांचा नाही. केवळ मुस्लिमांचा असता तर त्याला रब्बुल मुसलिमीन म्हटले गेले असते.परंतु कुरआनशरीफची जी  पहिलीच आयत आहे . ज्याची सुरुवात सुरए- फातेहा मध्ये होते .त्यात म्हटले आहे 'अल्हमदुलिल्लाही रब्बील आलमीन .म्हणजे तो ईश्वर, जो संपूर्ण सृष्टीचा (आलम ) रब आहे .
लोकांच्या मार्गदर्शनासाठी अल्लाहतआला ने कुरआन शरीफ हा ईश्वरी ग्रंथ आपला खास दूत फरिश्ता हजरत जीब्रईल मार्फत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यापर्यंत पोहोचवला . त्यांनी तो आपल्या अनुयायां मार्फत लोकांमध्ये आम (सार्वजनिक ) केला .अल्लाहने हा ग्रंथ फक्त मुस्लिमांसाठी नाही तर,या जगातील समस्त मानवजातीसाठी पाठविला आहे . म्हणून आज संपूर्ण जगभरामध्ये केवळ मुस्लिम नव्हे तर जगभरातील सर्व जाती आणि पंथाचे लोक कुरआनशरीफ समजून घेत आहेत . जगातील सर्व भाषांमध्ये त्याचे भाषांतर झालेले आहे . जगातील अनेक विद्यापीठांमध्ये कुरआन शरीफ वर खास संशोधन आजही सुरू आहे . मराठी भाषेत देखील कुरआन उपलब्ध आहे .माझ्या अनेक मराठी  मित्रांनी आत्तापर्यंत त्याचा लाभ घेतला आहे .ते कुरआन शरीफचे अध्ययन करतात आणि प्रश्नोत्तर रूपाने समजूनही घेतात.गेल्या वर्षी अहमदनगर मध्ये झालेल्या ग्रंथप्रदर्शनात सर्वाधिक विक्री मराठी भाषेतील कुरआन शरीफ या ग्रंथाची झाली हे विशेष.

हा ईश्वरी ग्रंथ रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पृथ्वीवर अवतरला. दरवर्षी रमजान मध्ये, जगामध्ये जसेजसे प्रसंग निर्माण होत, त्यानुसार अल्लाह कडून हजरत पैगंबरांना कुरआनच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळत असे . प्रेषित हजरत पैगंबरांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी नबुवत (प्रेषित्व )प्राप्त झाली . तद्नंतर लगेच कुरआनशरीफ चे अवतरण सुरू झाले . जवळपास तेवीस वर्षांच्या कालावधीमध्ये हा ग्रंथ हजरत पैगंबरांपर्यंत आला.त्यांनी तो लोकांपर्यंत पोहोचवला .प्रत्येक माणसाने आपले जीवन कशा प्रकारे व्यतीत करावे याचे सखोल मार्गदर्शन कुरआनशरीफ मध्ये अल्लाहतआलाने केले आहे.प्रत्येकाने काय करावे, काय करू नये, पुण्य कशामध्ये आहे, पाप कशामुळे होते,मोठ्यांशी कसे वागावे, छोटयांशी कसे वर्तन करावे,व्यवहारात पारदर्शकता कशी असावी अशा अनेक बाबी, ज्याआपल्या जीवनाशी संबंधित आहेत . त्याचे मार्गदर्शन कुरआनशरीफ मध्ये केलेले आहे. आज आपण कुरआनची शिकवण सोडून दिल्यामुळे संपूर्ण जगच संकटात सापडले आहे.यासाठीच कुरआनशरीफ समजून घेऊन त्याचा अंगीकार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्याची आवश्यकता आहे . (क्रमशः )
*सलीमखान पठाण*
*9226408082*

Saturday, May 2, 2020

परराज्यातील ५० प्रवासी त्यांच्या गावाकडे रवाना




परराज्यातील ५० प्रवासी त्यांच्या गावाकडे रवाना
*आपुलकीने सांभाळ केल्याबद्दल मानले प्रशासनाचे आभार

आज रात्री नगरहून राजस्थानसाठी प्रवासी बस रवाना करण्यात आली. लॉकडाउन काळात या बसेस मधील प्रवासी विनापरवाना जात असताना५० व्यक्तींना ताब्यात घेऊन निवारा गृहात दाखल करण्यात आले होते. शहरातील बडी साजन ओस्वाल मंगल कार्यालय या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
आज त्यांना त्यांच्या घरी जाण्यास मिळणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने अतिशय आपुलकीने काळजी घेतल्याबद्दल यंत्रणेतील प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले.  

दिनांक २७ मार्च रोजी अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाच्या माध्यमातून कडप्पा, आंध्रप्रदेश येथून राजस्थान कडे जाणाऱ्या या 50 जणांना नगर मध्ये प्रवेश करतेवेळी ताब्यात घेण्यात आले होते. येथे त्यांची राहण्या-खाण्याची व इतर वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात आली होती. बडी साजन ओसवाल श्री संघ व सकल राजस्थानी युवा मंच यांनी यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. या नागरिकांना  आज राजस्थानमधील जालोर, बाडमेर या जिल्ह्यांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे रवाना करण्यात आले. यामध्ये ४६  पुरुष व ०२ महिला तसेच ०२ लहान मुले आदी ५० जण होते. त्यांच्यासमवेत असलेल्या आंध्रप्रदेश येथील वाहनचालकांना उद्या, दिनांक ०३ मे रोजी सोडण्यात येणार आहे. त्याबरोबरच राजस्थानमधील करोली जिल्ह्यातील सुमारे 15 नागरिकांना रवाना करण्याची प्रक्रिया 3 मे रोजी संपन्न होणार आहे.     **

प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनेशहरातील रिक्षा चालकांसाठी किराण्याची मदत






प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनेशहरातील रिक्षा चालकांसाठी किराण्याची मदत


लॉक डाऊन काळात रिक्षाचालकांना सोसावे लागत आहे मरण यातना  

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनला दिड महिना उलटून जात असताना रिक्षांची चाके जागेवरच थांबलेली आहेत. दररोजची कमाई मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या शहरातील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली असताना प्रेरणा प्रतिष्ठानने रिक्षा चालकांच्या थांबलेल्या संसाराला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर जिल्हा ऑटो, रिक्षा व टॅक्सी चालक संघटनेच्या सदस्यांना किराणा साहित्याचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, सल्लागार विलास कराळे, दत्ता वामन, अशोक औशिकर, लतीफ शेख, रावसाहेब काळे, रवींद्र वाबळे, अशोक कारळे, राहुल गोरे, राजेंद्र टिपरे, मुन्ना शेख आदिंसह रिक्षाचालक उपस्थित होते.
शहरात निम्म्याहून अधिक रिक्षा कर्जावर नवीन घेण्यात आल्या आहेत. लॉक डाऊनमुळे रिक्षांचा अत्यावश्यक सेवेत समावेश होत नसल्याने त्यांना बाहेर पडणे देखील मुश्कील झाले आहे. दररोज शहराच्या विविध भागात रिक्षा धावत असतात. मात्र कोरोनाच्या लॉक डाऊनचा काळ रिक्षाचालकांसाठी मरण यातना देणारा ठरत आहे. कर्जाचे हप्ते कसे फेडावे? हा गंभीर प्रश्‍न देखील त्यांना भेडसावत आहे. शिपवर (भाड्याने) दिवसभर रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकणार्‍या चालकांच्या कुटुंबाची तर अत्यंत बिकट परस्थिती आहे. मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शहरातील रिक्षा चालकांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करुन आधार देण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या सिमेवरील नाकेबंदी कडक



जिल्ह्याच्या सिमेवरील नाकेबंदी कडक
एका व्यक्तिचा अहवाल पॉज़िटिव

पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवड़े येथील ४५ वर्षीय व्यक्तिचा कोरोना बाधित  पुण्याच्या लष्करी मेडिकल महाविद्यालय येथील अहवाल पॉजिटिव आला आहे. जिल्ह्यातील कोरोनो बाधित रुग्णाची संख्या ४४ झाली आहे.जिल्ह्याच्या सिमेवर नाकेबंदी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढले आहे.अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर यांनी दिली.