Tuesday, May 12, 2020

रमजानुल मुबारक -१९ *कसे वागावे कसे जगावे*


रमजानुल मुबारक -१९
 *कसे वागावे कसे जगावे*
पवित्र रमजान महिन्याचे शेवटचे दहा अकरा दिवस आता बाकी आहेत. उद्या रमजान महिन्याचा दुसरा कालखंड पूर्ण होणार आहे. मगफिरत च्या या काळात प्रत्येकानेअल्लाहतआलाची माफी मागून आपल्या कृत्यांबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.करीत आहेत.ज्यावेळी अल्लाहने या पृथ्वीतलावर मानव जन्माला घातला. त्यावेळी पैगंबर हजरत आदम आणि हजरत हव्वा ही जोडी निर्माण केली.पुढे त्यांच्यापासून अपत्य निर्मिती होऊन आजच्या जगातील सर्व माणसे अस्तित्वात आली. (या अनुषंगाने आजची सर्व माणसं ही एकमेकांची नातेवाईक आहेत).वेळोवेळी या माणसांनी जेव्हा जेव्हा सत्याचा मार्ग सोडून इतर मार्ग धरला, तेव्हा त्यांना परत योग्य मार्गावर आणण्यासाठी त्या त्या काळामध्ये अनेक पैगंबर निर्माण केले गेले.त्यांनी आपल्या समकालीन लोकांना अल्लाहला अभिप्रेत असलेला मार्ग सांगितला. ज्यावेळी लोकांनी फारच मनमानी केली त्यावेळी त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा पण मिळाली. अशाप्रकारे जवळपास सुमारे एक लक्ष चोवीस हजार पैगंबर या पृथ्वीतलावर होऊन गेले. शेवटी अल्लाहतआला ने कुरआन मार्फत हे जाहीर करून टाकले कि हजरत मोहम्मद हे आता शेवटचे प्रेषित असून यानंतर कोणीही पैगंबर येणार नाही.मानवाने जर आपल्या चुका सुधारल्या नाही तर या सृष्टीचा शेवट होईल. अनेक धर्मांच्या शिकवणुकीतून ही बाब सर्वमान्य आहे कि या सृष्टीचा शेवट आता जवळ आलेला आहे. कारण माणसे आता सर्व प्रकारची नीतिमत्ता सोडून वागू लागली आहेत. स्वैराचार वाढला आहे. कोणत्या धर्माने वाईट कृत्यांचे समर्थन केलेले नाही. तरी सुद्धा आज सर्वत्र दुष्कृत्ये वाढीस लागली आहेत. जो तो आपल्या मर्जीने वागत आहे. मुस्लिम असेल तर कुरआनमध्ये सांगितलेल्या गोष्टी विरुद्ध ते वागत आहेत. इतर धर्मीय असतील ते सुद्धा धर्माच्या विरुद्ध वर्तन करीत आहेत. त्यामुळे अल्लाह आणि ईश्वर यांनी सांगितल्याप्रमाणे कयामत जवळ आलेली आहे. प्रत्येक जण हा विचार करतोय कि मी कसा जरी वागलो तर काय होणार आहे. परंतु या विकृत विचारसरणीतूनच गैरप्रकार वाढले आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले कमी आणि वाईट करणारे जास्त झाले आहेत. त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे. एकीकडे धार्मिक कार्याचा महापूर येतो. प्रवचने होतात, तब्लिगी मेळावे होतात, हरिनाम सप्ताह होतात, दानधर्म होतात, नेकीचे कार्य केले जातात आणि दुसरीकडे अल्लाह किंवा ईश्वराने जे करायला सांगितले नाही ते करणारे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य करतात. धर्माने दारू निषिद्ध केली तरी दारू पिणारे आणि विकणारे वाढले.अश्लीलता वाढली. व्यभिचार, दुराचार वाढले. नीतिमत्ता बदलली. व्याजाचे धंदे वाढले. फसवणूक करणारे वाढले. कर्जबुडवे सुद्धा वाढले. खोटेपणाने सत्ता उपभोगणारे वाढले. हे चित्र जगात सर्वत्र पाहायला मिळत आहे.हे सर्व अति झाल्यामुळे या जगाचा ऱ्हास जवळ आला आहे याबद्दल कोणालाही शंका नाही. म्हणून येणाऱ्या युगामध्ये जे सत्मार्गाने जीवन जगतील,ते अल्लाहची मर्जी संपादन करतील आणि कयामतच्या दिवशी ते स्वर्गाचे हक्कदार होतील. इतरांचे काय होईल हे सांगण्याची आवश्यकता नाही. देवाने ही जीवन दिले. त्यात आपण कसे वागायचे हे ज्याने  त्याने ठरवले पाहिजे.अल्लाहतआला सर्वांना चांगले वागण्याची सुबुद्धी देवो. आमीन .
*सलीमखान पठाण*
*9226408082*

Sunday, May 10, 2020

रमजानुल मुबारक -१७ *आपल्या संरक्षणार्थ जकात* पवित्र रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक



रमजानुल मुबारक -१७
*आपल्या संरक्षणार्थ जकात*
पवित्र रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक जण आपल्या वार्षिक व्यवहाराचा हिशोब करून जर आपण जकात देण्यास पात्र असू तर ती आदा करीत असतो. जकात देण्याचे सुद्धा काही निकष आहेत. ज्याला आवश्यकता आहे त्यालाच ती दिली पाहिजे.ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांना जकात देता येत नाही.जकातीचा मुख्य उद्देश हा व्यक्तीच्या दैनिक आवश्यक गरजा पूर्ण करणे,दारिद्र्य निर्मूलन करणे हा आहे. त्यासाठी समाजातील गोरगरिबांना शोधून त्यांची मदत केली पाहिजे. जकात देताना घेणारी व्यक्ती कोणत्याही प्रकारे अपमानित होणार नाही, तिची समाजामध्ये फार चर्चा होणार नाही,घेणाऱ्याला कमीपणा वाटणार नाही अशा पद्धतीने द्यावयाची असते. एका हाताने देतांना दुसऱ्या हाताला सुद्धा खबर होणार नाही ही पद्धत त्यासाठी अंगीकारली पाहिजे.

अनेक प्रसंगांमुळे माणसे अडचणीत येतात. व्यवहारात झालेले मोठे नुकसान, मोठी चोरी, अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान अशा विविध कारणांमुळे चांगली चांगली माणसं कंगाल होऊन जातात. अशा लोकांना मदतीची खूप गरज असते. काही घटक असे असतात कि त्यांचं कोणी नसतं. त्यांना मदतीची आवश्यकता असते.काही कुटुंब अशी आहेत कि त्यांचं पालनपोषण करणारा कोणी नाही. अशांना मदतीची आवश्यकता असते. अनाथ, विधवा, आजारी, निराधार लोकांना सुद्धा मदत करण्याची आवश्यकता असते. समाजातील अशा सर्व प्रकारच्या गरजू घटकांना जकातीच्या रकमेतून मदत केली जाते.हे एक प्रकारचे गुप्तदान आहे. याचा फार गवगवा किंवा देखावा करू नये. अल्लाहलआलाची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या आदेशानुसार आपण हे सत्कार्य करीत आहोत. याचा मोबदला आपल्याला तोच देणार आहे ही श्रद्धा ठेवून जकात दिली जाते. इथे वशिलेबाजी अजिबात चालत नाही.जकात आदा करण्यासाठी केला जाणारा हिशोब स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन करावयाचा असतो.

त्यासाठी आपले सर्व व्यवहार लिहून ठेवा असे हजरत पैगंबरांनी सुद्धा सांगितले आहे. तोंडी व्यवहारांमध्ये गफलत होण्याची शक्यता असते. म्हणून कोणताही व्यवहार, कुणाशी जरी केला जात असला तरी त्याची नोंद करून ठेवली पाहिजे. कारण विस्मरणामुळे आपण विसरून जातो आणि मग त्यातून नवे प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी आर्थिक असो किंवा इतर प्रकारचे व्यवहार लिहून ठेवणे आवश्यक आहे.
जकात वर्षभरात कधीही आदा केली तरी चालते. मात्र रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक कामाला सत्तर पट पुण्य मिळत असल्यामुळे ती रमजानमध्ये आदा करण्याची रीत जगभर आहे. यावर्षी कोरोनामुळे गेले दोन महिने आपल्याकडे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेक माणसं आणि त्यांची घरे वरून चांगली दिसत असली तरी आतली परिस्थिती फक्त त्यांनाच माहिती आहे. अशा सर्व घटकांना समाजातून मोठी मदत दिली जात आहे. यावर्षी रमजान महिन्याची वाट न पाहता सर्व घटकांनी मदतीचा हात गरजूंना दिला. त्याचा मोबदला अल्लाहतआला प्रत्येकाला चांगला देईल याबद्दल कोणीही शंका बाळगू नये . (क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*9226408082*

Saturday, May 9, 2020

रमजानुल मुबारक - १५ *कयामत आनेवाली है...*



रमजानुल मुबारक - १५
*कयामत आनेवाली है...*

पवित्र रमजान महिन्याचा अर्धा कालावधी आज पूर्ण होत आहे . पंधरा दिवसांपूर्वी जेव्हा महिना सुरू झाला तेव्हा कोरोनाचे सावट, बंद असलेल्या मशिदी, उन्हाची वाढलेले तीव्रता या सर्व पार्श्वभूमीवर महिना कसा जाईल ही चिंता प्रत्येकाला वाटत होती .आता अर्धा काळ निघून गेल्यानंतर दररोजची सवय झाली आहे . आता वर्षभर जरी रमजान महिना राहिला तरी काही होणार नाही एवढे रमजानचे वातावरण अंगवळणी पडले आहे . तहान भूक विसरून फक्त अल्लाहची इबादत हे एकमेव ध्येय समोर ठेवून घराघरातून रमजान महिन्याचे पालन केले जात आहे . लहान मुलापासून वृद्धावस्थेतील माणसांपर्यंत सर्वजण मनोभावे अल्लाहची प्रार्थना करीत आहेत . कुरआन शरीफचे वाचन करीत आहेत . नमाज पठण करीत आहेत . दानधर्म करीत आहेत .सहेरी आणि इफ्तारच्या उपक्रमांनी प्रत्येकाची दिनचर्या बदलून गेली आहे .जगाबरोबर देशात आणि राज्यात वाढत जाणारा कोरोनाचा प्रादुर्भाव काळजाचे ठोके चुकवत आहे . अनेक चांगली माणसे , आप्त,स्वकीय कोरोनाचा बळी ठरले आहेत .एका छोट्याशा  विषाणूने संपूर्ण जगास वेठीस धरले आहे . की सर्व त्या विधात्याची किमया आहे . मोठमोठ्या सत्ता, सामर्थ्य आज हतबल ठरले आहेत. सृष्टीचा निर्माता, ईश्वर, अल्लाह, परमेश्वर हाच या संकटातून वाचवू शकतो, ही धारणा दृढ झाली आहे. डॉक्टरांच्या रूपामध्ये तो आपल्या भक्तांना वाचवीत आहे . हजारो लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले असले तरी तेवढेच या रोगातून बरे सुद्धा होत आहेत .

कोरोना का आला ? कुरआन शरीफ मध्ये म्हटले आहे, ज्या ज्या वेळी जगात स्वैराचार वाढत असतो. त्यावेळी आम्ही आपली झलक दाखवून आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवीत असतो. आज आपण पाहतोय गेल्या काही वर्षांमध्ये माणसाच्या मनमानीने जगभरात थैमान घातले आहे. कोणत्याही प्रकारची लाज,लज्जा, मर्यादा, आदर न बाळगता प्रत्येकाच्या मनाला वाटेल तसा तो वागत आहे. साधन,शुचिता, सामाजिक संकेत बाजूला ठेवून माणसे स्वैराचारी बनली आहेत. स्वार्थीपणामुळे ज्याला जे योग्य वाटतं तसं तो वागतोय. निसर्गाचा असमतोल निर्माण झाला आहे. सृष्टीचे प्रदूषण वाढले आहे. या सर्वांना ठीक करण्यासाठी कोरोना आला आहे.पण तो लवकरच जाणार आहे.आज रमजान ईद सर्वत्र साधेपणाने साजरे करण्यासाठी प्रत्येकाची मनोभूमिका तयार झाली आहे. ही पहिली ईद आहे कि या ईदला नवीन कपडे घेण्याची कुणाचीच मानसिकता राहिलेली नाही .पंचवीस मे पर्यंत दुकाने उघडू नये अशी मागणी आता मुस्लिम समाजातून होत आहे . हे परिवर्तन फार मोलाचे आहे . किमान सहा महिने तरी या परिस्थितीतून बाहेर यायला लागणार आहेत .त्यामुळे ईद जरी साधेपणाने झाली तरी येणारी दिपावली सर्व देशवासीयांची जोरात होईल अशी अपेक्षा करू या .आज निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे अल्लाह तआला ने कुरआन शरीफ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कयामत जवळ आली आहे . याची लक्षणे आहेत . तेव्हा माणसा, आता तरी तू सुधर बाबा .एवढेच आपण म्हणू शकतो. एका शायरने म्हटले आहे
मानते है वबा के दिन है, मगर ये भी खुदा के दिन है,दिलो से मायूसिया निकालो ,जरा सा आगे शिफा के दिन है .
 इन्शा अल्लाह ... (क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*9226408082*

Thursday, May 7, 2020

रमजानुल मुबारक - १३ *जीवनाचा सर्वनाश - दारू*




रमजानुल मुबारक - १३
*जीवनाचा सर्वनाश - दारू*

पवित्र रमजान महिन्यांमध्ये कुरआन शरीफ चे वाचन ( तिलावत) सर्वत्र मोठ्या प्रमाणात केले जाते . घराघरातून मुले, मुली, महिला, पुरुष सर्वजण कुरआन पठाण करीत असतात . महिनाभरामध्ये काहीजण दहा-दहा वेळा सुद्धा कुरआन शरीफ ची तिलावत करतात . तरावीह च्या नमाज मध्ये देखील कुरआन पठण केले जाते . पूर्ण महिनाभरात किमान एकदा तरी कुरआन पठण करावे . काही ठिकाणी तरावीहमध्ये सहा दिवस, दहा दिवस, वीस दिवसांमध्येच पूर्ण कुरआन पठण केले जाते . बहुतेक मशिदीमधून दररोज तरावीहची नमाज संपन्न झाल्यानंतर जेवढ्या भागाचे पठण करण्यात आले आहे, त्याचा भावार्थ आणि विश्लेषण स्थानिक बोलीभाषेत केले जाते. त्यामुळे लोकांना मूळ अरबी भाषेतील कुरआनमध्ये अल्लाहतला ने काय संदेश दिला आहे हे समजते . केवळ कुरआन पठण न करता त्यामध्ये अभिप्रेत असलेला अर्थ समजून घेणे आवश्यक आहे .
काल-परवा केंद्र आणि राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली .त्यानंतर दारू खरेदीसाठी लोकांच्या लागलेल्या रांगा देशभरात सर्वत्र पाहायला मिळाल्या. केरळमध्ये तर कळसच झाला. दारूच्या दुकानासमोरील रांगा नियंत्रित करण्यासाठी तेथे सरकारने शिक्षकांच्या नियुक्त्या  केल्या . यापेक्षा मोठे दुर्दैव नाही .
 इस्लामपूर्व काळात सुद्धा दारू पिली जात होती . सन हिजरी दोन मध्ये अल्लाहतआला ने कुरआन मार्फत संदेश देऊन इस्लाम धर्म मानणाऱ्यासाठी दारू हराम करार दिली . दारूचे सेवन वर्ज्य केले गेले .जे दारू सेवन करणारे आहेत ते मोठे गुन्हेगार ठरवले गेले .

लॉक डाऊन मुळे गेल्या दीड महिन्यापासून सर्व प्रकारची दुकाने बंद असल्यामुळे दारूची दुकाने देखील बंद होती. त्यामुळे घरातील बायका मात्र खूप आनंदात होत्या.कारण त्यांचा घर मालक दररोज शुद्धीत होता. घरातील मुले ,मुली खूप आनंदी होते, कारण त्यांचे वडील, बाबा दररोज त्यांच्याबरोबर घरामध्ये संवाद साधत होते. परंतु सरकारचे डोकं फिरलं. दारूमुळे खूप महसूल मिळेल आणि कोरोना मुळे ढासळत चाललेली अर्थव्यवस्था मूळ पदावर येईल असा जावई शोध कुणीतरी लावला आणि ही दुकाने सुरू केली गेली. एक काळ असा होता कि दारूच्या दुकानांमध्ये दारू घ्यायला माणसे घाबरत होती. लपून छपून दारू घेत होती. आपल्याला कोणी पाहिलं तर आपली इभ्रत जाईल ही भीती मनामध्ये होती. पण आता ही सर्व भीती वेशीवर टांगून लोकांनी दारूच्या दुकानापुढे दोन किलोमीटरच्या रांगा लावल्या. हे पाहून खरोखर आपण आता कलियुगाच वावरत आहोत याची खात्री पटली.
 इस्लाम धर्माने सुरुवातीपासूनच दारूचा तिरस्कार केला आहे. ज्या घरांमध्ये दारू सेवन करणारी माणसे आहेत त्या घराचे घरपण नष्ट झालेले दिसून येते.एका माणसाच्या चुकीच्या सवयी चे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. पिढी बरबाद होते. माणूस खूप चांगला ,परंतु या एका वाईट सवयी मुळे त्याची समाजातील प्रतिष्ठा कमी होते. याची जाणीव संबंधितांना असून सुद्धा दारूच्या आहारी गेल्याने नाहक बदनामी पदरी येते. अनेक कुटुंब या व्यसनापायी उध्वस्त झालेली दिसून येतात. दिवसभर काबाडकष्ट करून आणलेला पैसा दारू मध्ये घातला जातो. पुन्हा सकाळी उधारी साठी हात पसरले जातात. हे चित्र अतिशय विदारक आहे.  म्हणून प्रत्येकाने या व्यसनापासून दूर राहणे हे त्याच्या स्वतःच्या हिताचे तर आहेच,परंतु आपल्या कुटुंबाच्या सुद्धा हिताचे आहे. दारू एक असे व्यसन आहे कि त्याच्यामुळे इतर अनेक मोठे गुन्हे माणसाकडून घडत असतात. दुर्दैवाने सरकारचं पाठबळ असल्याने दारू विक्रीचा व्यवसाय वाढला. लॉक डाऊन मध्ये सुद्धा मागच्या दाराने विक्री चालू होती, पण आता राजरोसपणे ही दुकाने सुरू करून सरकारनेच कुटुंब व्यवस्था उध्वस्त करण्याचे ठरविले आहे की काय ? सरकारमध्ये असा एकही जबाबदार व्यक्ती नाही कि जो दारूच्या उत्पन्नापेक्षा होणारे कौटुंबिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक नुकसान राज्यकर्त्यांना समजावून सांगेल. जे लोक रांगा लावून हजार रुपये दारू साठी खर्च करीत आहेत त्यांना गरीब कसे म्हणायचे ? शासनाने दारूच्या दुकानातील बिले ऑनलाइन करून अशा खरेदीदारांना कोणत्याही प्रकारच्या सवलती देऊ नये असे वाटते . अल्लाहतआला या व्यसनापासून सर्वांचे रक्षण करो .आमीन . ( क्रमशः )
*सलीमखान पठाण*

  • *9226408082*

Wednesday, May 6, 2020

"आणि माणसांचा जथ्था निघाला... पायी, अनवाणी, रक्ताळलेली, वेदनांचा डोह उन्हाखाली जिरवून..!"




#प्रगतीपथावरील_युवा #लेख_क्रमांक_१२

     "आणि माणसांचा जथ्था निघाला... पायी, अनवाणी, रक्ताळलेली, वेदनांचा डोह उन्हाखाली जिरवून..!"


पाणी, मेडिकल, झंडु  बाम, जेवण, बिस्कीट, फळ आणि रात्री भेटलेच तर झोपण्यासाठी अभय द्या...

माणसंच आहेत ती...!
      लोकांना हे आवाहन करीत स्वतःसुध्दा या लाँकडाऊनच्या कालावधीत घराकडे जाण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने जीवाच्या आकांताने पायी जाणा-या शेकडो लोकांना आतापर्यंंत  स्वखर्चानेे जेवणाची -राहण्याची व्यवस्था करणा-या,भटक्या-निराधार बांधवांना नवजीवनाची संजीवनी देणा-या, समाजकार्यासाठी स्वतःला वाहुन दिलेल्या,आभाळ उसवलेल्यांचा ख-या अर्थाने #आधार ठरलेले #आधार_सेवा_संकल्प_फाऊंडेशनचे_सर्वेसर्वा_जयवंत_मोटे यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेणारा हा लेख.

#कोण_आहे_जयवंत_मोटे...
       आपल्यासारखाच सर्वसामान्य कुटुंबातला शेतक-याचा पोरगा, गाव वडाळा बहिरोबा ता. नेवासा. पुस्तकाची शाळा कमी शिकला पण स्वार्थी समाजात राहुन अनुभवाच्या शाळात पीएचडी केलेला. शेतीला जोडधंदा म्हणुन वडाळ्यात छोटेखानी हाँटेल अन् वाँशिंग सेंटर चालवुन उदरनिर्वाह करणारा पैलवान गडी. कुस्त्याची भारी हौस गड्याला पण ऐन उमेदीच्या काळात डोक्यावरील वडीलरुपी छत्र हरपल्याने आपल्या इच्छा -आकांक्षाचा त्याग करुन प्रपंचाचा गाडा हाकणारा.बालपण खुपच हलाखीच्या परिस्थिति मध्ये गेल्याने गरीबीची जाण ठेवणारा.ज्या यातना आपण भोगल्या त्या इतर कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणुन अहोरात्र राबणारा.
      लाँकडाऊनमुळे हातावर पोट असणारे स्थलांतरीत मजुर वाहनांअभावी तळपत्या उन्हात अंगाची काहिली होत असताना आपल्या चिल्या-पिल्यांसह अन्न-पाण्याविना जीवाच्या आकांताने  चालत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे .अशा कुटुंबियांची आस्थेने विचारपुस करुन त्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करुन त्यांना रात्री अपरात्री राहण्यासाठी निवारा ते देत आहेत. दीड महिन्यांपासुन हे काम अविरत सुरु आहे.गेल्या  आठवड्यात  #यवतमाळकडे पायी जात असलेल्या महिलेला वडाळ्यात प्रसुतिवेदना सुरु झाल्या. त्यांची परिस्थिति जयवंत भाऊने ओळखली,अनोळखी गाव अनोळखी माणसं अशा परिस्थितिमध्ये त्या महिलेचा पती रडवेल्या चेह-याने मदतीची याचना करत होता.  गावातीलच आशा स्वयंसेविकांच्या मदतीने त्या कुटुंबियांना #आधार देत सुखरुपपणे बाळंतपण त्या महिलेचे झाले. जात, धर्म, पंथ नाही तर फक्त माणुसकीचा धर्म निभावणारा आमचा #जयवंत_भाऊ.

"#दुसरों_कि_सेवा_करने_मे_अगर_आनंद_मिले_तो_वह_सेवा_है_वरना_बाकी_सब_दिखावा_है..

#बेघर_निराधारांच्या_सेवेसाठी_स्वतःला_वाहुन_घेणारा_अवलिया...
काही महिन्यांपुर्वी एका मनोरुग्ण गरोदर महिलेची सेवासुश्रुषा करुन आठ दहा दिवस तिचा सांभाळ करुन ,सोशल मीडियाच्या माध्यमातुन तिच्या घरच्यांचा शोध लावत तिला घरपोच केले. असे बरेच मनोरुग्ण आहेत जे आपल्या आसपास फिरत असतात, त्यांचे कुणाला काही घेणे देणे नसते. ते कुठे खात असतील वगैरे विचार तर लांबच.... असाच एक मनोरुग्ण असलेले त्यांना आढळला अपघात झाल्याने पाय फ्रँक्चर होता पाच -सहा दिवसांपासुन एकाच जागेवर बसुन... पाहताक्षणी किळस यावी असा अवतार मळके कपडे, वाढलेले केस -दाढी त्यात एकाच जागेवर बसुन असल्याने मल -मुत्र त्याच जागी अक्षरशः ओकारी यावी अशी परिस्थिति अशा मनोरुग्णाची किळस न करता त्यांनी त्याला अंघोळ घातली, न्हावी कटींग करायला धजावेना म्हणुन स्वतः त्याचे केस कापले,जखमेवर मलमपट्टी करुन त्याला बरे केले. आधिक माहिती काढली असता तो मनोरुग्ण व्यक्ती माजीसैनिक होता. त्यालाही घरी पोहोच केले.
       अशा अनेक बेघर मनोरुग्णांची सेवा-सुश्रुषा करुन ते काहीच तपास नाही लागला तर मोठ्या स्वयंसेवी संस्था, निराधारांसाठी जिथं राहण्याची -जेवणाची व्यवस्था आहे अशा संस्थांच्या ताब्यात ते या निराधार लोकांना देत आहेत.

#वडिलांच्या_पावन_स्मृतींना_अभिवादन_म्हणुन_हे_काम...
      जयवंत भाऊचे वडील आध्यात्मिक वृत्तीचे होते. दरवर्षी पंढरीची वारी ठरलेली, भजन -किर्तनात तल्लीन असलेल वारकरी संप्रदायाचा पाईक असलेलं व्यक्तिमत्व.हे बारा बर्षांचे असताना असेच त्यांचे वडील चारधाम यात्रेसाठी गेले होते. त्यांना पर्यटनाची आवड असल्याने ते सहसा लवकर घरी येत नसत,त्या वर्षी वडील घरी न येता त्यांच्या निधनाची बातमी घरी येऊन धडकली .मनमाड रेल्वे स्टेशनवर त्यांचा मृतदेह सापडला होता या भावंडावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, आधारछत्र हरपले होते.
       अँन्बुलन्स दारात आली आवंढा गिळत माहिती घेण्याचा प्रयत्न कुटुंबियांनी केला असता त्या थंडीच्या दिवसात वडीलांच्या अंगावर फक्त कपडे होते. त्यांना दम्याचा त्रास होता. अंगावर उबदार पांघरुन नसल्याने ती थंडी सहन न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने ते मरण पावले होते. इतक्या लोकांच्या गर्दीत कुणाला वडीलांची दया आली नाही किती ते निर्दयी लोक, वेळीच त्यांची परिस्थिति बघुन आजुबाजुला असणारांनी त्यांना दवाखाव्यात हलवले असते तर आज ते जीवंत असते पण माणुसकी सर्वांकडेच नसते ओ....
        वडिलांच्या निधनानंतर खुप अडी-अडचणींचा सामना करावा लागला, नाती -गोती, भावकी सारे काही कळले. काही वर्षांनी स्वतःची परिस्थिति जरा बरी झाल्यानंतर वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा बेघर -निराधार लोकांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी घेतलेे आहे आणि ते निभावत आहेत.

#स्वतःसाठी_सारेच_जगतात_थोडे_समाजासाठी_जगा...
#छत्रपतींचा_सेवक_जयवंत_मोटे

       शिव-शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीला अनुसरुण वाटचाल करणा-या जयवंत भाऊंना हे काम करत असताना खुप अडचणी येतात. स्वतः काही करायचे नाही पण लोकांचे पाय ओढायचे अशा समाजविघातक प्रवृत्ती ही समोर येत असतात परंतु कोणत्याही परिस्थिति मध्ये हे काम थांबवायचे नाही हे त्यांनी मनाशी ठरवले आहे. शिवजयंतीला डिजे लावुन त्यापुढे नाचायचे नसते तर त्या रयतेच्या कल्याणासाठी लढलेल्या शिवबाची शिकवण अंगीकारायची. शिवबांचे विचार प्रत्यक्षात अमलात आणुन #छत्रपतींचा_सेवक म्हणुन काम करायचे हे त्यांनी ठरवलंय.....

#लोग_जुडते_गये_कारवाँ_बनता_गया...
     हे काम करत असताना समाजभान जपणा-या मित्रांचे सहकार्य लाभते. चकलांब्याचे माझे मित्र #कैलास_शिंदे दादा तुमच्यामुळे माणुसकी जपणा-या या अवलियाशी ओळख झाली तुमचे मनस्वी आभार
      #जयवंत_भाऊ तुमच्या कार्याला माझा सलाम, आता शुभेच्छा नाही तर सोबत मिळुन काम करु.....

#एस_मुन्ना_७०५७०५५५८५ 🙏

Tuesday, May 5, 2020

रमजानुल मुबारक - १२ *कुरआन मधील जीवन*




रमजानुल मुबारक - १२

*कुरआन मधील जीवन*

पवित्र रमजान महिन्यांमध्ये कुरआनशरीफ चे पृथ्वीतलावर अवतरण झालेले असल्याने या महिन्यांमध्ये जगभरामध्ये सर्वाधिक कुरआन पठण केले जाते . याला तिलावते कुरआन म्हणतात . तसं कुरआन शरीफ हा ग्रंथ दररोज वाचण्यासारखा आहे . मूळ अरबी भाषेत असलेल्या या ग्रंथाचं नुसतं वाचन न करता त्यातील अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे .
दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक घटना अनाकलनीय असतात. अचानकपणे काही प्रसंग निर्माण होतात. अशा प्रसंगी नेमका कोणता निर्णय घ्यावा हे आपल्याला सुचत नाही. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून कुरआनशरीफ मधील अल्लाहतआलाचे आदेश आणि उपदेश आपल्याला मार्गदर्शक ठरत असतात. दररोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या

समस्यांपैकीअनेक प्रश्नांची उकल कुरआन शरीफ मध्ये नमूद केलेली आहे . त्याचबरोबर हजरत पैगंबर आणि त्यांच्या नंतरचे सगळेच धार्मिक जाणकारांनी माणसाने कसे वागावे ?याबाबत काही अनमोल उपदेश केलेले आहेत.जसे- जर सदैव आनंदित रहावयाचे असेल तर वेळेवर नमाज अदा करावी. चेहरा तजेलदार राहावा असे वाटत असेल तर तहज़जुद( मध्यरात्रीनंतर आदा केली जाणारी नमाज )अदा करावी. जर मनाला शांतता हवी असेल तर कुरआनशरीफ ची तिलावत करावी. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोजे धरावेत. समस्यांची उकल करायची असेल तर अस्तगफार करावा. (असतगफार म्हणजे अल्लाहतआलाची मागितलेली माफी ) .जर बरकत पाहिजे असेल तर दरुद शरीफ पठण करावे . (दरूद शरीफ म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहो अलैहे व सल्लम यांच्या नावाने केला जाणारा जप) समस्या आणि चिंता मुक्त व्हावयाचे असेल तर लाहौल वला कुव्वता इल्ला बिल्ला .या श्लोकाचे पठण करावे . दुःखांपासून चिंतामुक्त होण्यासाठी दुआ मागावी . नेहमी अल्लाहचे नामस्मरण करावे . प्रेषित हजरत पैगंबरांनी दाखवून दिलेल्या मार्गावर सदैव मार्गक्रमण करावे . आपल्यामुळे कोणाला ही कशा ही प्रकारचे दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी . नेहमी खरेच बोलावे . खोटे बोलून आपले पुण्य वाया घालवू नये .गरजू महिला-पुरुष, मुले, मुली यांची नेहमी मदत करावी.विधवा आणि अनाथ यांना नेहमी मदत करावी .
आपण करीत असलेले प्रत्येक कृत्य हे अल्लाहला ज्ञात आहे . मग ते उजेडात करा किंवा अंधारात करा . त्यामुळे सतत अल्लाहची भीती मनात ठेवून जीवन जगावे . कारण या दुनियेत आपण करणार असलेल्या प्रत्येक कार्याचा हिशोब कयामतच्या दिवशी होणार असून आपण केलेल्या कार्या प्रमाणे जमाखर्च होऊन आपल्या जीवनाचं निकाल पत्रक (नाम ए आमाल) प्रत्येकाला प्राप्त होणार आहे . त्यामुळे मी हे केलं पण कुणाला माहीत नाही, मी ते केलं पण कोणी ही पाहिले नाही . या भ्रमात कोणीही राहू नये . (क्रमशः )
*सलीमखान पठाण*
*9226408082*

लाँकडाऊन_वास्तविकता_आणि_जगण्याचा_संघर्ष





लाँकडाऊन_वास्तविकता_आणि_जगण्याचा संघर्ष


       नमस्कार मित्रांनो,तारीख पे तारीख लाँकडाऊनची वाढत चालली आहे. टीव्ही पाहुन काही दिवसानी लोकं  हर्ट अँटँकने मरतील इतक्या त्या घाबरवणा-या बातम्या.कोरोना महामारीचं जागतिक संकट ओढवलंय, मान्य परंतु आज हातावर पोट भरणारा वर्ग, छोटी -मोठी कामे करुन उपजीविका भागवणारा वर्ग, शेतमजुर, अगदी भंगार गोळा करुन प्रपंच चालवणा-या लोकांच्या घरात आज काय परिस्थिति असेल? विचार करुनच अंगाचा थरकाप उडतो. कुठलीही प्रिंट मिडीया, न्युज चँनेल्स, दिग्गज लोकांच्या माध्यमातुन तुमच्यासमोर हे चित्र येणार नाही /आणले जाणार नाही परंतु या लेखाच्या माध्यमातुन तुमच्या -माझ्या समस्यांना/अडचणींना वाचा फोडण्याचा प्रयत्न आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या नावाखाली होणा-या गर्दीने कोरोनाचा संसर्ग होत नाही काय? दारुवाल्यानी -मावा विकणारे काय उच्छाद मांडलाय सर्वांना माहित आहे ते सांगणार नाही. खरेतर लाँकडाऊन फक्त गोर-गरीबांचे रोजगार हिसकावुन पाळायचा असतो यावर आता शिक्कामोर्तबच झाले आहे. टनाने शेतक-याचा टरबुज /खरबुज, भाजीपाला असा माल विक्रीअभावी वाया गेला पण #अर्थव्यवस्थेचा_कणा म्हणुन दारु विकणाराला परवानगी द्यायची अन् शेतकरी उभा जाळायचा ही आमची धोरणं आहेत....
     #कष्टकरी_वर्ग_माझा_अन्नदाता_आहे_आपसुकच_त्यांच्याविषयी_जास्त_आस्था_आहे...

#अब_अपना_क्या_होगा_मुन्नाभाई_?
     प्रत्येकाचाच हा प्रश्न खुप अस्वस्थ करतो... भावांनो मीच सध्या खुप हँग झालोय.
   या महामारीमुळे आपण सर्वजण घरात बसुन आहोत. सध्या कुणाच्याच हाताला रोजगार नसल्याने आपल्यासारखे दहातले नऊजण हवालदिल आहेत, आला दिवस त्यांची चिंता वाढवणारा ठरत आहे.पाच-सहा वर्षांपुर्वी मी औरंगाबाद एमआयडीसी परिसरात काम करत होतो. तेव्हा औरंगाबादची बरीच कामगार मंडळी सोबत होती. माझी परिस्थिति तिकडे सर्वांना माहित असल्याने त्यांच्या डब्यात ते मला जेऊ घालायचे. त्यामुळे तिथल्या प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. असाच काही महिन्यांपुर्वी त्यातल्या एका मित्राने अडचणीत आहे, बचतगटाचा हफ्ता थकलाय तीन हजाराची मदत करु शकतो का म्हणुन विणवणी केली. त्याला बोललो सध्या मीच रिव्हर्स आलोय भावा, दोन हजार तुला पोहोच करतो. त्यानंतर काही महिन्यांनी लाँकडाऊन लागला. प्रत्येकाची ठराविक दिवसांनी फोन करुन हालहवाल विचारण्याची सवय मला आहे, असाच गेल्या आठवड्यात त्याला फोन केला, त्याला वाटलं मुन्नाभाई पैशासाठी फोन करतोय ,दबक्या सुरात बोलला "यार मुन्नाभाई बहोत परेशानी चलरी यार, महिनेसे घर में बैठा हु कुछ भी काम नही है, फिलहाल तो तेरे पैसे नै दे पाऊंगा... " वयाच्या विशीतच बापाचे छत्र हरपले, पश्चात दोन छोटे भाऊ, आई, औरंगाबाद मध्ये भाड्याचे घर, त्याला चार आकडी भाडे, भावांचे शिक्षण अशा परिस्थितिमध्ये स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडुन तो माझ्याबरोबर कंपनीत कामाला यायचा. माझीही परिस्थिति तीच असल्याने आम्ही समदुःखी होतो. आज तो घरात बसुन आहे, कमवणारा एकटा आहे, घरभाडे मालकाने माफ केले तर बरे नाहीतर खुपच वाईट वेळ येईल ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले, मी चिंताग्रस्त झालो.
          दुसरा एक मित्र गेवराईचा काही दिवस माझ्यासोबत रिक्षा चालवायचा,आता खाजगी बसवर चालक म्हणुन काम करतो. मला फोन करुन बोलला " मुन्नाभाई टेन्शन मत लो यार तुम यहा पे गेवराई आ जाओ, कुछ जुगाड करता तुम्हारे लिये... "मी त्याला नम्रपणे नकार दिला.  अशी समजुन घेणारी माणसं आहेत जीवनात म्हणुन काही वाटत नाही .घरी मी बसलेलो असताना माझा भाऊ सतत चिंतेत असतो त्याच्या चेह-यावरचे भाव मला समजतात पण मी त्याला बोलुन दाखवत नाही तो मला बोलत नाही.

#लाँकडाऊन_रमजान_आणि_मुसलमान...
       कधी नव्हे ते यावर्षी भर उन्हाळ्यात रमजानचा महिना आला आहे. त्यात कोरोनाची महामारी. अाज माझा पंचरवाला, चहावाला, रिक्षावाला, भाजीवाला, हमाली करणारा, मजुरी करणारा, मिळेल ते काम करणारा, कष्ट हेच भांडवल समजणारा प्रत्येक बांधव आज घरात बसुन आहे .मुस्लिम समाजात हातावर कमुन खाणारे 80% लोक आहेत. शेतीवाडीचा विषयच नाही.कुठल्याही कामाला आम्ही लाजत नाही, मेहनत करुन आपला चरितार्थ प्रत्येकजण भागवत असतो.
       आज कोरोनाच्या महामारीमुळे बेकारीची कु-हाड सर्वांवर कोसळली आहे, प्रत्येकजण हवालदिल झालाय. या पवित्र रमजान महिन्यात वर्षातला सर्वात मोठा सण रमजान ईद साजरी केली जाते.महिनाभर प्रत्येक घरात आनंदाचे धार्मिक वातावरण असते. या महिन्यात इतर महिन्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट खर्च असतो... शिरखुर्मा-गुलगुले बसवण्यासाठी लागणारा किराणा ,लहानग्यांपासुन आबालवृध्दांपर्यंत प्रत्येकाला नवीन कपडे, चपला आणि बरंच काही..... परंतु यावर्षी परिस्थिति खुपच बिकट आहे कर्ते-धर्ते घरात बसुन आहे, कोरोनाचे सावट या आनंदाच्या क्षणांवर आहे.
      समाजातील सुशिक्षित वर्गाकडुन आपला जकातचा पैसा गरजुंना द्या जेणेकरुन त्यांनाही सण साजरा करता येईल अशी मोहीम राबवली जातेय प्रत्यक्षात त्याची अंमलबजावहणी ही होईल. कुणीच या आनंदाच्या क्षणांपासुन वंचित राहायला नको हीच अल्लाहकडे प्रार्थना आहे....
      लिहीण्यासारखं खुप आहे पण पुन्हा कधीतरी......
एस मुन्ना , बोधेगाव ,शेवगाव