Sunday, May 10, 2020

रमजानुल मुबारक -१७ *आपल्या संरक्षणार्थ जकात* पवित्र रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक



रमजानुल मुबारक -१७
*आपल्या संरक्षणार्थ जकात*
पवित्र रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक जण आपल्या वार्षिक व्यवहाराचा हिशोब करून जर आपण जकात देण्यास पात्र असू तर ती आदा करीत असतो. जकात देण्याचे सुद्धा काही निकष आहेत. ज्याला आवश्यकता आहे त्यालाच ती दिली पाहिजे.ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांना जकात देता येत नाही.जकातीचा मुख्य उद्देश हा व्यक्तीच्या दैनिक आवश्यक गरजा पूर्ण करणे,दारिद्र्य निर्मूलन करणे हा आहे. त्यासाठी समाजातील गोरगरिबांना शोधून त्यांची मदत केली पाहिजे. जकात देताना घेणारी व्यक्ती कोणत्याही प्रकारे अपमानित होणार नाही, तिची समाजामध्ये फार चर्चा होणार नाही,घेणाऱ्याला कमीपणा वाटणार नाही अशा पद्धतीने द्यावयाची असते. एका हाताने देतांना दुसऱ्या हाताला सुद्धा खबर होणार नाही ही पद्धत त्यासाठी अंगीकारली पाहिजे.

अनेक प्रसंगांमुळे माणसे अडचणीत येतात. व्यवहारात झालेले मोठे नुकसान, मोठी चोरी, अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान अशा विविध कारणांमुळे चांगली चांगली माणसं कंगाल होऊन जातात. अशा लोकांना मदतीची खूप गरज असते. काही घटक असे असतात कि त्यांचं कोणी नसतं. त्यांना मदतीची आवश्यकता असते.काही कुटुंब अशी आहेत कि त्यांचं पालनपोषण करणारा कोणी नाही. अशांना मदतीची आवश्यकता असते. अनाथ, विधवा, आजारी, निराधार लोकांना सुद्धा मदत करण्याची आवश्यकता असते. समाजातील अशा सर्व प्रकारच्या गरजू घटकांना जकातीच्या रकमेतून मदत केली जाते.हे एक प्रकारचे गुप्तदान आहे. याचा फार गवगवा किंवा देखावा करू नये. अल्लाहलआलाची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या आदेशानुसार आपण हे सत्कार्य करीत आहोत. याचा मोबदला आपल्याला तोच देणार आहे ही श्रद्धा ठेवून जकात दिली जाते. इथे वशिलेबाजी अजिबात चालत नाही.जकात आदा करण्यासाठी केला जाणारा हिशोब स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन करावयाचा असतो.

त्यासाठी आपले सर्व व्यवहार लिहून ठेवा असे हजरत पैगंबरांनी सुद्धा सांगितले आहे. तोंडी व्यवहारांमध्ये गफलत होण्याची शक्यता असते. म्हणून कोणताही व्यवहार, कुणाशी जरी केला जात असला तरी त्याची नोंद करून ठेवली पाहिजे. कारण विस्मरणामुळे आपण विसरून जातो आणि मग त्यातून नवे प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी आर्थिक असो किंवा इतर प्रकारचे व्यवहार लिहून ठेवणे आवश्यक आहे.
जकात वर्षभरात कधीही आदा केली तरी चालते. मात्र रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक कामाला सत्तर पट पुण्य मिळत असल्यामुळे ती रमजानमध्ये आदा करण्याची रीत जगभर आहे. यावर्षी कोरोनामुळे गेले दोन महिने आपल्याकडे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेक माणसं आणि त्यांची घरे वरून चांगली दिसत असली तरी आतली परिस्थिती फक्त त्यांनाच माहिती आहे. अशा सर्व घटकांना समाजातून मोठी मदत दिली जात आहे. यावर्षी रमजान महिन्याची वाट न पाहता सर्व घटकांनी मदतीचा हात गरजूंना दिला. त्याचा मोबदला अल्लाहतआला प्रत्येकाला चांगला देईल याबद्दल कोणीही शंका बाळगू नये . (क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*9226408082*

No comments:

Post a Comment