Thursday, May 7, 2020

रमजानुल मुबारक - १३ *जीवनाचा सर्वनाश - दारू*




रमजानुल मुबारक - १३
*जीवनाचा सर्वनाश - दारू*

पवित्र रमजान महिन्यांमध्ये कुरआन शरीफ चे वाचन ( तिलावत) सर्वत्र मोठ्या प्रमाणात केले जाते . घराघरातून मुले, मुली, महिला, पुरुष सर्वजण कुरआन पठाण करीत असतात . महिनाभरामध्ये काहीजण दहा-दहा वेळा सुद्धा कुरआन शरीफ ची तिलावत करतात . तरावीह च्या नमाज मध्ये देखील कुरआन पठण केले जाते . पूर्ण महिनाभरात किमान एकदा तरी कुरआन पठण करावे . काही ठिकाणी तरावीहमध्ये सहा दिवस, दहा दिवस, वीस दिवसांमध्येच पूर्ण कुरआन पठण केले जाते . बहुतेक मशिदीमधून दररोज तरावीहची नमाज संपन्न झाल्यानंतर जेवढ्या भागाचे पठण करण्यात आले आहे, त्याचा भावार्थ आणि विश्लेषण स्थानिक बोलीभाषेत केले जाते. त्यामुळे लोकांना मूळ अरबी भाषेतील कुरआनमध्ये अल्लाहतला ने काय संदेश दिला आहे हे समजते . केवळ कुरआन पठण न करता त्यामध्ये अभिप्रेत असलेला अर्थ समजून घेणे आवश्यक आहे .
काल-परवा केंद्र आणि राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली .त्यानंतर दारू खरेदीसाठी लोकांच्या लागलेल्या रांगा देशभरात सर्वत्र पाहायला मिळाल्या. केरळमध्ये तर कळसच झाला. दारूच्या दुकानासमोरील रांगा नियंत्रित करण्यासाठी तेथे सरकारने शिक्षकांच्या नियुक्त्या  केल्या . यापेक्षा मोठे दुर्दैव नाही .
 इस्लामपूर्व काळात सुद्धा दारू पिली जात होती . सन हिजरी दोन मध्ये अल्लाहतआला ने कुरआन मार्फत संदेश देऊन इस्लाम धर्म मानणाऱ्यासाठी दारू हराम करार दिली . दारूचे सेवन वर्ज्य केले गेले .जे दारू सेवन करणारे आहेत ते मोठे गुन्हेगार ठरवले गेले .

लॉक डाऊन मुळे गेल्या दीड महिन्यापासून सर्व प्रकारची दुकाने बंद असल्यामुळे दारूची दुकाने देखील बंद होती. त्यामुळे घरातील बायका मात्र खूप आनंदात होत्या.कारण त्यांचा घर मालक दररोज शुद्धीत होता. घरातील मुले ,मुली खूप आनंदी होते, कारण त्यांचे वडील, बाबा दररोज त्यांच्याबरोबर घरामध्ये संवाद साधत होते. परंतु सरकारचे डोकं फिरलं. दारूमुळे खूप महसूल मिळेल आणि कोरोना मुळे ढासळत चाललेली अर्थव्यवस्था मूळ पदावर येईल असा जावई शोध कुणीतरी लावला आणि ही दुकाने सुरू केली गेली. एक काळ असा होता कि दारूच्या दुकानांमध्ये दारू घ्यायला माणसे घाबरत होती. लपून छपून दारू घेत होती. आपल्याला कोणी पाहिलं तर आपली इभ्रत जाईल ही भीती मनामध्ये होती. पण आता ही सर्व भीती वेशीवर टांगून लोकांनी दारूच्या दुकानापुढे दोन किलोमीटरच्या रांगा लावल्या. हे पाहून खरोखर आपण आता कलियुगाच वावरत आहोत याची खात्री पटली.
 इस्लाम धर्माने सुरुवातीपासूनच दारूचा तिरस्कार केला आहे. ज्या घरांमध्ये दारू सेवन करणारी माणसे आहेत त्या घराचे घरपण नष्ट झालेले दिसून येते.एका माणसाच्या चुकीच्या सवयी चे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. पिढी बरबाद होते. माणूस खूप चांगला ,परंतु या एका वाईट सवयी मुळे त्याची समाजातील प्रतिष्ठा कमी होते. याची जाणीव संबंधितांना असून सुद्धा दारूच्या आहारी गेल्याने नाहक बदनामी पदरी येते. अनेक कुटुंब या व्यसनापायी उध्वस्त झालेली दिसून येतात. दिवसभर काबाडकष्ट करून आणलेला पैसा दारू मध्ये घातला जातो. पुन्हा सकाळी उधारी साठी हात पसरले जातात. हे चित्र अतिशय विदारक आहे.  म्हणून प्रत्येकाने या व्यसनापासून दूर राहणे हे त्याच्या स्वतःच्या हिताचे तर आहेच,परंतु आपल्या कुटुंबाच्या सुद्धा हिताचे आहे. दारू एक असे व्यसन आहे कि त्याच्यामुळे इतर अनेक मोठे गुन्हे माणसाकडून घडत असतात. दुर्दैवाने सरकारचं पाठबळ असल्याने दारू विक्रीचा व्यवसाय वाढला. लॉक डाऊन मध्ये सुद्धा मागच्या दाराने विक्री चालू होती, पण आता राजरोसपणे ही दुकाने सुरू करून सरकारनेच कुटुंब व्यवस्था उध्वस्त करण्याचे ठरविले आहे की काय ? सरकारमध्ये असा एकही जबाबदार व्यक्ती नाही कि जो दारूच्या उत्पन्नापेक्षा होणारे कौटुंबिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक नुकसान राज्यकर्त्यांना समजावून सांगेल. जे लोक रांगा लावून हजार रुपये दारू साठी खर्च करीत आहेत त्यांना गरीब कसे म्हणायचे ? शासनाने दारूच्या दुकानातील बिले ऑनलाइन करून अशा खरेदीदारांना कोणत्याही प्रकारच्या सवलती देऊ नये असे वाटते . अल्लाहतआला या व्यसनापासून सर्वांचे रक्षण करो .आमीन . ( क्रमशः )
*सलीमखान पठाण*

  • *9226408082*

No comments:

Post a Comment