Tuesday, May 12, 2020

रमजानुल मुबारक -१९ *कसे वागावे कसे जगावे*


रमजानुल मुबारक -१९
 *कसे वागावे कसे जगावे*
पवित्र रमजान महिन्याचे शेवटचे दहा अकरा दिवस आता बाकी आहेत. उद्या रमजान महिन्याचा दुसरा कालखंड पूर्ण होणार आहे. मगफिरत च्या या काळात प्रत्येकानेअल्लाहतआलाची माफी मागून आपल्या कृत्यांबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.करीत आहेत.ज्यावेळी अल्लाहने या पृथ्वीतलावर मानव जन्माला घातला. त्यावेळी पैगंबर हजरत आदम आणि हजरत हव्वा ही जोडी निर्माण केली.पुढे त्यांच्यापासून अपत्य निर्मिती होऊन आजच्या जगातील सर्व माणसे अस्तित्वात आली. (या अनुषंगाने आजची सर्व माणसं ही एकमेकांची नातेवाईक आहेत).वेळोवेळी या माणसांनी जेव्हा जेव्हा सत्याचा मार्ग सोडून इतर मार्ग धरला, तेव्हा त्यांना परत योग्य मार्गावर आणण्यासाठी त्या त्या काळामध्ये अनेक पैगंबर निर्माण केले गेले.त्यांनी आपल्या समकालीन लोकांना अल्लाहला अभिप्रेत असलेला मार्ग सांगितला. ज्यावेळी लोकांनी फारच मनमानी केली त्यावेळी त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा पण मिळाली. अशाप्रकारे जवळपास सुमारे एक लक्ष चोवीस हजार पैगंबर या पृथ्वीतलावर होऊन गेले. शेवटी अल्लाहतआला ने कुरआन मार्फत हे जाहीर करून टाकले कि हजरत मोहम्मद हे आता शेवटचे प्रेषित असून यानंतर कोणीही पैगंबर येणार नाही.मानवाने जर आपल्या चुका सुधारल्या नाही तर या सृष्टीचा शेवट होईल. अनेक धर्मांच्या शिकवणुकीतून ही बाब सर्वमान्य आहे कि या सृष्टीचा शेवट आता जवळ आलेला आहे. कारण माणसे आता सर्व प्रकारची नीतिमत्ता सोडून वागू लागली आहेत. स्वैराचार वाढला आहे. कोणत्या धर्माने वाईट कृत्यांचे समर्थन केलेले नाही. तरी सुद्धा आज सर्वत्र दुष्कृत्ये वाढीस लागली आहेत. जो तो आपल्या मर्जीने वागत आहे. मुस्लिम असेल तर कुरआनमध्ये सांगितलेल्या गोष्टी विरुद्ध ते वागत आहेत. इतर धर्मीय असतील ते सुद्धा धर्माच्या विरुद्ध वर्तन करीत आहेत. त्यामुळे अल्लाह आणि ईश्वर यांनी सांगितल्याप्रमाणे कयामत जवळ आलेली आहे. प्रत्येक जण हा विचार करतोय कि मी कसा जरी वागलो तर काय होणार आहे. परंतु या विकृत विचारसरणीतूनच गैरप्रकार वाढले आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले कमी आणि वाईट करणारे जास्त झाले आहेत. त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे. एकीकडे धार्मिक कार्याचा महापूर येतो. प्रवचने होतात, तब्लिगी मेळावे होतात, हरिनाम सप्ताह होतात, दानधर्म होतात, नेकीचे कार्य केले जातात आणि दुसरीकडे अल्लाह किंवा ईश्वराने जे करायला सांगितले नाही ते करणारे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य करतात. धर्माने दारू निषिद्ध केली तरी दारू पिणारे आणि विकणारे वाढले.अश्लीलता वाढली. व्यभिचार, दुराचार वाढले. नीतिमत्ता बदलली. व्याजाचे धंदे वाढले. फसवणूक करणारे वाढले. कर्जबुडवे सुद्धा वाढले. खोटेपणाने सत्ता उपभोगणारे वाढले. हे चित्र जगात सर्वत्र पाहायला मिळत आहे.हे सर्व अति झाल्यामुळे या जगाचा ऱ्हास जवळ आला आहे याबद्दल कोणालाही शंका नाही. म्हणून येणाऱ्या युगामध्ये जे सत्मार्गाने जीवन जगतील,ते अल्लाहची मर्जी संपादन करतील आणि कयामतच्या दिवशी ते स्वर्गाचे हक्कदार होतील. इतरांचे काय होईल हे सांगण्याची आवश्यकता नाही. देवाने ही जीवन दिले. त्यात आपण कसे वागायचे हे ज्याने  त्याने ठरवले पाहिजे.अल्लाहतआला सर्वांना चांगले वागण्याची सुबुद्धी देवो. आमीन .
*सलीमखान पठाण*
*9226408082*

No comments:

Post a Comment