Saturday, May 9, 2020

रमजानुल मुबारक - १५ *कयामत आनेवाली है...*



रमजानुल मुबारक - १५
*कयामत आनेवाली है...*

पवित्र रमजान महिन्याचा अर्धा कालावधी आज पूर्ण होत आहे . पंधरा दिवसांपूर्वी जेव्हा महिना सुरू झाला तेव्हा कोरोनाचे सावट, बंद असलेल्या मशिदी, उन्हाची वाढलेले तीव्रता या सर्व पार्श्वभूमीवर महिना कसा जाईल ही चिंता प्रत्येकाला वाटत होती .आता अर्धा काळ निघून गेल्यानंतर दररोजची सवय झाली आहे . आता वर्षभर जरी रमजान महिना राहिला तरी काही होणार नाही एवढे रमजानचे वातावरण अंगवळणी पडले आहे . तहान भूक विसरून फक्त अल्लाहची इबादत हे एकमेव ध्येय समोर ठेवून घराघरातून रमजान महिन्याचे पालन केले जात आहे . लहान मुलापासून वृद्धावस्थेतील माणसांपर्यंत सर्वजण मनोभावे अल्लाहची प्रार्थना करीत आहेत . कुरआन शरीफचे वाचन करीत आहेत . नमाज पठण करीत आहेत . दानधर्म करीत आहेत .सहेरी आणि इफ्तारच्या उपक्रमांनी प्रत्येकाची दिनचर्या बदलून गेली आहे .जगाबरोबर देशात आणि राज्यात वाढत जाणारा कोरोनाचा प्रादुर्भाव काळजाचे ठोके चुकवत आहे . अनेक चांगली माणसे , आप्त,स्वकीय कोरोनाचा बळी ठरले आहेत .एका छोट्याशा  विषाणूने संपूर्ण जगास वेठीस धरले आहे . की सर्व त्या विधात्याची किमया आहे . मोठमोठ्या सत्ता, सामर्थ्य आज हतबल ठरले आहेत. सृष्टीचा निर्माता, ईश्वर, अल्लाह, परमेश्वर हाच या संकटातून वाचवू शकतो, ही धारणा दृढ झाली आहे. डॉक्टरांच्या रूपामध्ये तो आपल्या भक्तांना वाचवीत आहे . हजारो लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले असले तरी तेवढेच या रोगातून बरे सुद्धा होत आहेत .

कोरोना का आला ? कुरआन शरीफ मध्ये म्हटले आहे, ज्या ज्या वेळी जगात स्वैराचार वाढत असतो. त्यावेळी आम्ही आपली झलक दाखवून आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवीत असतो. आज आपण पाहतोय गेल्या काही वर्षांमध्ये माणसाच्या मनमानीने जगभरात थैमान घातले आहे. कोणत्याही प्रकारची लाज,लज्जा, मर्यादा, आदर न बाळगता प्रत्येकाच्या मनाला वाटेल तसा तो वागत आहे. साधन,शुचिता, सामाजिक संकेत बाजूला ठेवून माणसे स्वैराचारी बनली आहेत. स्वार्थीपणामुळे ज्याला जे योग्य वाटतं तसं तो वागतोय. निसर्गाचा असमतोल निर्माण झाला आहे. सृष्टीचे प्रदूषण वाढले आहे. या सर्वांना ठीक करण्यासाठी कोरोना आला आहे.पण तो लवकरच जाणार आहे.आज रमजान ईद सर्वत्र साधेपणाने साजरे करण्यासाठी प्रत्येकाची मनोभूमिका तयार झाली आहे. ही पहिली ईद आहे कि या ईदला नवीन कपडे घेण्याची कुणाचीच मानसिकता राहिलेली नाही .पंचवीस मे पर्यंत दुकाने उघडू नये अशी मागणी आता मुस्लिम समाजातून होत आहे . हे परिवर्तन फार मोलाचे आहे . किमान सहा महिने तरी या परिस्थितीतून बाहेर यायला लागणार आहेत .त्यामुळे ईद जरी साधेपणाने झाली तरी येणारी दिपावली सर्व देशवासीयांची जोरात होईल अशी अपेक्षा करू या .आज निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे अल्लाह तआला ने कुरआन शरीफ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कयामत जवळ आली आहे . याची लक्षणे आहेत . तेव्हा माणसा, आता तरी तू सुधर बाबा .एवढेच आपण म्हणू शकतो. एका शायरने म्हटले आहे
मानते है वबा के दिन है, मगर ये भी खुदा के दिन है,दिलो से मायूसिया निकालो ,जरा सा आगे शिफा के दिन है .
 इन्शा अल्लाह ... (क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*9226408082*

No comments:

Post a Comment