Wednesday, April 22, 2020

मुकुंदनगर की यास्मीन शेख (बालभवन शिक्षिका) के जुबानी हकीकत भरी दास्तान

                                          न्यूज व्हलुज

मुकुंदनगर की यास्मीन शेख (बालभवन शिक्षिका) के जुबानी हकीकत भरी दास्तान

*"कुछ रहम कर ए जिंदगी,  थोड़ा संवर जाने दे....तेरा अगला जख्म भी सह लेंगे,  पर.. पहले वाला तो भर जाने दै"
"मुकुंदनगर" सध्या महाराष्ट्रात हे नाव खूपच गाजत आहे. करोना महामारीचे हॉट स्पॉट घोषित उपनगर. अहमदनगर शहरातील औरंगाबाद रोड वरील एक मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेली एक मोठी दुर्लक्षित, कोणतीही सोयी-सुविधा नसलेली वस्ती.सुमारे उपनगरात 50 ते 60 हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे, यामधील दर्गादायरा, संजोगनगर, बजाज कॉलनी, या परिसरात हातगाडीवाले, फेरीवाले, रिक्षावाले, भाजीपाला-फळे विकणारे, फिटर अशी हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कुटूंबाची संख्या अधिक प्रमाणात आहे.अश्याच कुटुंबातील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्नेहालयने 2006 साली मलाला बालभवनाची स्थापना केली. येथील एक गरजू कुटुंब म्हणजे आमच्या "निदा" च, निदाचे सध्या वय जेमतेम 12 वर्ष, दिसायला अतिशय गोड, पण ही जन्मत:  मतीमंद,  तिला अचानकपणे केव्हाही फिट येत असते.तिच्या घरात आई 'झारा' अतिशय प्रेमळ, मन मिलावू, आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणारी, तिचे हट्ट पुरविणारी, वडील सलिमभाई, जे हाताला काम भेटेल ते करणारे, नाही तर घरीच बसून बायकोच्या जीवावर जगणारे एक व्यसनी अहंकारी अनेक असतात.निदाला एक मोठी बहीन मुस्कान, जी जवळच्या मदरसा मध्ये धार्मिक शिक्षण घेते व एक छोटा भाऊ कैफ तो डॉ. झाकीर हुसेन ऊर्दू शाळेत चौथीला आहे. सोबत दादी हलीमाबी वय 70 च्या आसपास घरात बसून अल्लाह अल्लाह नामाचे स्मरण करणारी व पोरानं कडे लक्ष देणारी, एकन्दरीत सहा लोकांचे कुटुंब, एका 10x12 च्या अतिक्रमण केलेल्या पत्र्याचे शेड ठोकून बजाज कॉलनीमध्ये मागील 25 वर्षांपासून राहत आहे. आई जवळच्या चार पाच बंगल्यामध्ये धुणे-भांडे चे काम करते, व दुपारी वेळ काढून सासू बरोबर घरीच चिंच फोडण्याचे काम देखील करते. यातून जे काही कमाई होईल त्यावर आपला फाटका संसार चालवते. निदा व तिचा भाऊ कैफ हे दोघे आपल्या बालभवनचे मागील चार वर्षांपासूनचे लाभार्थी, निदा न चूकता आपल्या दादी सोबत सर्वात अगोदर अभ्यासाला  येवून बसणारी मुलगी, आता ती एक ते दहा पर्यंत लिहिते, चित्र काढते, थोडं-थोडं तुटक-मुटक गाणंही गाते आणि काही आवडले तर खूपच हस्ते, व काही मनासारखे झाले नाहीतर...... मग निदाला समजावणे कठीणच!
ज्यावेळी करोना महामारीने बाधित रोगी आपल्या अहमदनगर मध्ये तसेच  मुकुंदनगर मध्ये सापडले, त्यावेळी कलेक्टर साहेबांनी सर्व शहर बंद करून टाकले, लोकांना कोणतीही पूर्व सूचना दिली नाही, आणि कोणतीही तयारी न करू देता, सर्व बंद म्हणजे बंदच, त्यातल्या त्यात मुकुंदनगर हॉटस्पॉट क्षेत्र घोषित केले.येथे तर मागील 13 दिवसांपासून जीवनावश्यक वस्तू देखील बंद करण्यात आले आहे. ..कारण बजाज कॉलनीच्या अगदी 10 मीटरवर करोनाचे तीन रुग्ण सापडले होते. किसी ने क्या खूब कहा है....
"ए "मौत", जरा पहले आना, गरीब के घर, 'कफ़न' का खर्च, दवाओं में निकल जाता है."
पहिले दोन-तीन दिवस असे काही वाटले नाही... पण घरातील वस्तू, किराणा, भाजीपाला, औषधे व पैसा संपायला लागला. तेव्हा घरा-घरातुन येऊ लागले वेगवेगळे आवाज... तू.. तू.. मै.. मै.., भांडण, हाणामारी, शिव्यागाळ.... भुकेलेल्या मुलांचा रोटी-बोटी साठी मोठमोठ्याने रडण्याचा आवाज ....दादीचे नमाज मध्ये दुवा मागताना पदरात दोन्ही हाताने झाकुन हुंदके देऊन रडण्याचा आवाज, झाराआपा चा घरात काहीच नाही म्हणून नवऱ्या वर संताप व्यक्त करून,
 "मेरी तो किसमत ही फुटी है"
 म्हणून रडण्याचा आवाज, व सलीमभाई चा
" घर के बाहर निकलता हूं तो, पोलीस बहुत मारती है, और जेल में डालती है"
, म्हणून बेबस होऊन ओरडण्याचा आवाज.... हे सर्व आवाज आम्हां कार्यकर्त्यांच्या कानावर रोजच पडायला लागले.
."गजब का वायरस है, पहले ही क्या कम दूरियां थी लोगो के बीच..जो इसने ओर बढ़ा दी"
महामारीच्या बंदच्या तिसऱ्याच दिवशी हनिफ सरांनी आम्हांला 25 गरजवंत लोकांची यादी करायला लावली, आम्ही सर्वात आगोदर निदाच्या कुटूंबाचे नाव टाकले, यादी सरांना पाठवल्या बरोबर पुढील काही वेळात चाईल्ड लाईन टीम 'स्नेहालय सहयोग किट' म्हणजेच जीवनावश्यक शिधा किराणा घेऊन पोहोचले व त्वरित गरजवंत लोकांना मदत पोहच करा असे बजावले.मी तर किट घेऊन निदाच्या घरी धावत पळतच गेले. मला पाहून निदा खूप आनंदी झाली, झारा आपाच्या हातात पुढील 10-12 दिवस पुरेल एव्हढं किराणा त्यांच्याकडे दिला. त्या तर अचंबित होऊन एकटक माझ्याकडे पाहतच राहिल्या पण त्यांचे पाणावलेले डोळे खूप काही बोलून गेले आणि माझे ही.
या प्रसंगातही एक मजेशीर किस्सा आठवला.या शिदा वाटपा सोबत सरांनी आम्हाला बालभवन लाभार्थींच्या कागदपत्रांची डिटेल्स माहिती घेण्याची सूचना देखील दिल्या होत्या, म्हणजे आधारकार्ड, बँकखाते, नाव, मोबाईल क्रमांक असे बरेच काही.आम्ही विचारले हे आपल्याला कश्यासाठी हवे आहेत, सरांचे एकच उत्तर, करू काहीतरी या आपल्याच बालभवन परिवारासाठी बस एव्हढेच.आमचे तर सरांवर 101% विश्वास.आम्ही ज्यावेळी या वस्त्यांमध्ये माहिती गोळा करण्यासाठी जायचो तर, येथील नागरिक असंख्य आडवे तिडवे प्रश्न विचारायचे, त्याचे कारणही तसे होते, काही मुस्लिम कुटुंबियानी शंका उपस्थित केले,तसेच अशिक्षिताना समजावून सांगणे मोठे जिकरीचे होते.बहुतेक मुस्लिम नागरिक या माहितीला CAA/NRC ला जोडून पहायचे, तुम्ही ही माहिती घेऊन भारत सरकारला देणार, तुमची संस्था ही RSS ची आहे,  व ही माहिती घेतल्या नंतर सरकार मुस्लिम लोकांना देशांतून हाकलून लावणार.असे अनेक आरोप आमच्यावर करण्यात आले होते. तरीही आम्ही कार्यकर्ते या गोष्ठीना न घाबरता, न डगमगता, तुमचा जर आमच्यावर विश्वास असेल तरच माहिती द्या .असे धाडसाने बजावले सुमारे 85% टक्के लोकांनी माहिती आम्हांला त्वरित दिली.नंतर काही दिवसांनी आम्हाला समजले की सरांनी या कुटूंबासाठी आर्थिक सहयोग मिळावा म्हणून गिव्ह इंडिया या संस्थेला प्रस्ताव पाठवला होता तो मान्य ही झाला आहे.आपण या कुटूंबाना 5000/- रुपयांची मदत ऑनलाईन देणार आहोत.ही बातमी आम्हाला समजली.नदीचा उगम छोटा असतो पण ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.हे आज कळले, "आपले स्नेहालय किती लांबचा विचार करते या सर्व लोकांचा, म्हणून आम्हांला ही सार्थ अभिमान आहे या परिवाराचा"...तीन दिवसांपूर्वी स्नेहालयचे अध्यक्ष संजयजी गुगळे, सचिव राजीवजी गुजर, सह संचालक हनिफ सर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स कॉलद्वारे निदाच्या कुटूंबाशी संवाद साधला व त्यांच्या खात्यात 5000/- रुपये वर्ग केले, त्यावेळी त्यांच्या कुटुंबात जणू 'ईद' चा आनंदाचा माहोल झाला, ज्यावेळेस संजूभाऊ यांनी या कुटूंबाला विचारले,
 "आप इस पैसो का क्या करोंगे",
 झाराच्या दादीने सांगितले,
"हम सबसे पहले निदाकी दवाई खरेदी करेंगे, अगर उसका एक भी डोस छूट जाता है तो, उसे काफी झटके आते है".. झाराआपा म्हणाले,
"मै घर के लिए जीतनी जरूरत है उतना सामान, सबजी खरेदी करूंगी"
. निदाचे वडील सलीम भाई यांनी खूपच प्रामाणिकपणे सांगितले की,
"जैसे आपने हमारी मदत की है, हम भी किसी अनजान जरूरतमंद की मदत इन पैसो में से करेंगे".
 'मला माहीत नाही, हे सगळं काय चाललं हे निदाला समजत असेल, पण तिला बोलता येत नव्हते पण तिच्या हावभावातून, हसण्यातून व आनंद अश्रूतून ते मला जाणवत होतं'... काय माहीत ती एक प्रकारे स्नेहालयच्या कार्यकर्त्यांची कृत्यज्ञता तिच्या पद्धतीने व्यक्त करत असावी.

यास्मिन शेख
शिक्षिका
मलाला बालभवन मुकुंदनगर

यास्मिन शेख या आमचे बालभवन मध्ये शिक्षिका आहेत त्यांचे मनोगत. अस्वस्थ करणारे आणि आपल्या सुरक्षित जगा पासून कोसो दूर.( फोटो वेबसाईट वरून घेतला आहे, मुकुंदनगर चा नाही केवळ याची कल्पना यावी म्हणून टाकला आहे.)

No comments:

Post a Comment