Wednesday, April 29, 2020

"ह्या पत्राच्या घरातून दुसऱ्या घरात डोकावले कि सर्वाची एकच अवस्था!उदया काय करावे या लोकांसाठी ?"






"ह्या पत्राच्या घरातून दुसऱ्या घरात डोकावले कि सर्वाची एकच अवस्था!उदया काय करावे या लोकांसाठी ?"

        एखादी व्यक्ती जीवाची बाजी लावून नदी पार करित असते. पण त्या व्यक्तीला नदीच्या पाण्याचा पूर्णपणे अंदाज येत नाही. जसे जसे तो नदीच्या मध्यभागी जातो, तसे पाणी वाढत जाते, व ते पाणी त्याला खाली ओढन्याचा प्रयत्न करते... पण तरी ही तो किनाऱ्यावर जाण्यासाठी पाण्यात हातपाय मारतच असतो धडपड करतच असतो.... त्याच प्रमाणे आमच्या बालभवन स्थित झोपड़पट्टीतील लोकांची ही दुरावस्था झालेली आहे. या 'करोना माहमारीने' अशी
अवस्था केली कि बस, रामवाड़ी झोपड़पट्टी मध्ये अंदाजीत बारा ते चौदा हजार सर्व जाती धर्माचे लोक दीड ते दोन एकर जागेवर राहतात. त्यामधील 300 कुटुंबा सोबत आपले बालभवन काम करते. जस जसे आपण स्नेहालय सह्योग किट वाटत आहोत. ते पुरेसे लोकांपर्यंत पुरत नसतात. कारण ते अतिगरजू लोकांची यादी करून, मोजके किट मोजक्या लोकांनाच देण्यात येते.... पण सर्व वस्तीवरच अवकळा पसरली आहे. तसेच परिसरातील सर्वच लोकांची परिस्थिती आता एक महिन्यानंतर बघवत नाही .जर ह्या पत्राच्या घरातून दुसऱ्या घरात डोकावले कि सर्वाची एकच अवस्था... मुले भुकेसाठी रडतात, आई व्याकूळतेने समजवते, कि जरा वेळेने देते तुला खाण्यास... तर घरातील पुरुष मंडळी खाली गुडघ्यात मुंडके घालून हताशपणे बसलेले. काय म्हणतील बायकोला व काय म्हणतील मुलांना कोठून आणतील चारा त्या चिमण्या पाखराला. तर दुसरे चित्र म्हतारे आई-वडील, केविल वाणी सुनाकडे व मुलाकडे बघताना दिसतात. त्याच्याच लेकरांना त्यांना जेवु घालायला घरात काही नाही, तर या म्हातारांचे काय? ते भुकेने शरीराचे वेटोळे करून गप्प, झोपेचे सोंग घेऊन मेल्याप्रमाणे पडलेले, व सुनांचा, मुलांचा व नातवंडाचा झालेल्या कोंडमारा व ते आपल्या डोळ्यात बघतात त्यांचे ते मुटकुळे केलेले शरीर त्यांचे पानवलेले डोळे काही तरी सांगतात पण शब्द फुटत नाही.... गप्प बसून येणाऱ्या जाणाऱ्याची हालचाल बघतात....कोणी अन्नदाता येईल का आज??... यांच्या मदतीला परिसरात आपण गेलो कि, ते आपल्या हाताकडे बघतात, व निराश नजरेने म्हणतात, बायानों तुम्ही तरी कुणा कुणाला पुरताल...कोणा कोणाचे पोट भराल... कोणा कोणाला देशाल... जेवढे भेटते तेच खरे आमचे समाधान... नाही भेटले तर आमचच फुटक नशीब... त्यांना आमची पण दयनिय अवस्था समजते,  हे लोक पण कुठुन व किती मदत गोळा करुण आनतील आणि किती पोट भरतील .... एवढा कसा समजुतदार पणा आला यांच्यात... "यांच्या पोटातील भुकेने कि या आजाराने दिला"..... नेहमी प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंसाठी भांडत राहणारी वस्ती, कशी शांत झाली... जसे त्याच वस्तीवर अचानकपणे दुखाचे मोठे सावट पसरले...आम्ही सर्व कार्यकर्ते फक्त दिलासा देत," धिर धरा ताई, जातील हे दिवस, विश्वाची परिक्षा विश्वभर घेत आहे आपली". पुन्हा आपण सर्व यातून लवकरच बाहेर पडु. डोळ्यात पाणी आणु नका, फक्त बाहेर पडु नका. त्यांची परिस्थिती पाहून मन कसे गहिवरून येते. तुम्ही जर सेवावस्तीतुन जर एक चक्कर मारली, तर तुमची रात्रीची झोप उडेल.... तुम्ही फक्त त्याच विचारात रहाल, काय करु मी यांच्यासाठी?? कसे करु?? व हे भीषण वास्तव चित्र आम्हाला तर दररोज उघड़या डोळ्यांनी बघताना खुप वाईट वाटते... आम्ही सेवावस्तीतुन निघतो तेव्हा अंतकरण खुप जड झालेले असते. त्या जड मनाने रात्रभर अंथरूणवर पडून पंख्याकडे टक लावून बघायचे...व विचार करायचे, उदया काय करावे या लोकांसाठी.... रोज सकाळी उठून मोबाईलकडे लक्ष द्यायचे.... या आशेने, कुणाचा फोन येतो का??  तुमच्या लोकांसाठी काही मदत देतो म्हणून.... कोठून तरी सह्योग किट येतात का? परत या उमेदीने कामावर जातो.... व जे दान  करणारे दाते आहेत त्यांच्या घरांकडे रोज डोळे लावून आम्ही बसतो.... या आशेने..
        "दार उघड बाई... आता दार उघड"...

रजिया दफेदार
समन्वयक
शितिज बालभवन, रामवाड़ी

        

No comments:

Post a Comment