Thursday, April 30, 2020

*आत्मशुद्धीस आवश्यक - रोजा*




                            रमजानुल मुबारक - ६

                 *आत्मशुद्धीस आवश्यक - रोजा*
रमजान महिन्यातील प्रार्थनेचा मुख्य भाग म्हणजे रोजा किंवा उपवास . सूर्योदयापूर्वी पहाटेपासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दिवसात काहीही न खाता-पिता आत्म संयमाने रोजा पूर्ण केला जातो.
रोजा पाळणे म्हणजे केवळ भुकेले किंवा उपाशी राहणे नव्हे .आपले मन, मस्तिष्क, शरीर आणि संपूर्ण देहावर रोजामुळे नियंत्रण ठेवले जाते . बरेच लोक रोजा याचा अर्थ उपाशी राहणे एवढाच घेतात . परंतु अल्लाहतआला  ला रोजा मध्ये फक्त उपवास करणे अभिप्रेत नाही, तर आपल्या शरीराच्या संपूर्ण हालचालींवर स्वयंपद्धतीने नियंत्रण ठेवणे अभिप्रेत आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती रोजा धरण्याचा निश्चय करते आणि त्यासाठी सहेरी करते. त्यानंतर सायंकाळी सूर्यास्त होईपर्यंत मगरीबची अजाण होण्यापूर्वी दिवसभरात कितीही तहान लागली, भूक लागली तरी सुद्धा, खूप इच्छा असूनही पाणी पिण्याची किंवा काही खाण्याचे धारिष्ट्य ती व्यक्ती दाखवीत नाही. एकट्याने अंधारात किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन सुद्धा तो खाऊ पिऊ शकतो. परंतु त्याचा आत्मा आणि मनात असलेली अल्लाहची श्रद्धा किंवा अल्लाहाची भीती त्याला हे कृत्य करू देत नाही. त्याच्या मनामध्ये एक विचार रुजलेला असतो कि मी आज रोजा धरला आहे आणि मला तो आता सूर्यास्तापर्यंत पुर्ण करायचा आहे. तो केल्यानंतर मला अल्लाहकडून विशेष इनाम आखिरतमध्ये प्राप्त होणार आहे. याविचारामागे स्वयंशिस्त आहे. जी त्याने अंगी बाणलेली आहे . ही शिस्तच त्याला परमात्मा आणि आत्मा यांच्यातील दुवा साधण्यास मदत करते.

एखादा गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो तेव्हा त्याला या गुन्ह्याबद्दल होणाऱ्या शिक्षेची जाणीव किंवा माहिती असते. तरीपण तो असे गुन्हे करतो. काही सराईत प्रकारचे गुन्हेगार वारंवार ते गुन्हे करतात. त्यांच्या मनातून शिक्षेची भीती नाहीशी झालेली असते. कारण त्यांना माहित आहे येथील सर्व व्यवस्था ही मॅनेज होऊ शकते.परंतु ईश्वराची निर्माण केलेली व्यवस्था ही हाताळता येत नाही. तो नाराज झाला म्हणून लगेच शिक्षा देत नाही. तो आपल्या भक्तांवर आईच्या मायेपेक्षा जास्त प्रेम करतो. भक्तांनी चुका किंवा गुन्हे करू नये असे त्याला वाटते. केलेल्या चुकांबद्दल माफी मागण्याची संधी सुद्धा तो उपलब्ध करून देत असतो. रोजा सुद्धा अशीच एक संधी आहे. या संधीचा उपयोग करून आपण आपली आत्मशुद्धी करीत असतो .प्रार्थना किंवा इबादत केल्याने मनावरचे दडपण कमी होते . त्यासाठीच ईश्वराची आराधना अर्थात इबादत केली जाते . रोजा सुद्धा त्याची आराधना  करण्याचे एक साधन आहे . ते केल्याने मनाला, आत्म्याला एक प्रकारची शांती ( सुकून) प्राप्त होत असते . मानवी स्वभाव दोषाला नियंत्रित करण्याचे काम सुद्धा रोजा करीत असतो .दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या पंचायती करून बिनकामाचे लोक समाजामध्ये एक प्रकारचे अराजक निर्माण करतात . रोजा अशा अराजक निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद घालण्याचे काम करतो .इतरांना कामाला लावून मजा पाहणाऱ्या वृत्तीला लगाम लावतो .प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहून जीवन व्यतीत करावे याचे प्रशिक्षण रोजातून मिळते .रोजा म्हणजे मानवी कल्याणासाठी आवश्यक मूल्ये आपल्यामध्ये रुजविण्याचे बहुमोल असे माध्यम आहे .(क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*9226408082*



No comments:

Post a Comment