Monday, April 27, 2020

रमजानुल मुबारक - ४ *संयमाचा महिना - रमजान*




रमजानुल मुबारक - ४
*संयमाचा महिना - रमजान*

संपूर्ण इस्लामी जगतामध्ये पवित्र रमजानचा महिना हा संयम म्हणजे सब्र का महिना म्हणून गणला जातो. कुरआनशरीफ मध्ये संयमाचा मोबदला जन्नत आहे . या महिन्यांमध्ये केले जाणारे प्रत्येक कार्य खूप संयमपूर्वक केले जाते.
रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक मुस्लिमांच्या दिनचर्येत एक आमूलाग्र असा बदल झालेला असतो. रोज पहाटे उठून सहरी खाणे,फजरची नमाज अदा करणे, कुरआनशरीफ ची तिलावत करणे,मग थोडा आराम, नंतर दैनंदिन कामकाज, दुपारी जोहरची नमाज,थोडावेळ वामकुक्षी (याला कैलुल्लाह म्हणतात ) पुढे असरची नमाज, इफ्तारीची  तयारी, रोजा इफ्तार करणे व मगरीबची नमाज आदा करणे, नंतर ईशा व तरावीहची नमाज,नंतर थोडावेळ आराम, पुन्हा तहज्जूदच्या नमाजसाठी जागणे, सहरीची तयारी असा हा महिनाभराचा कार्यक्रम असतो. हे सर्व कार्य करताना थोडी चिडचिड सुद्धा होते. स्वभावात बदल होतो. अशावेळी प्रत्येकाने संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. असं खुद्द अल्लाहतआला ने कुरआन मध्ये नमूद केले आहे. जो येणाऱ्या सर्व प्रसंगांना सामोरे जात संयमाने पूर्ण महिना व्यतीत करतो, त्याला मोबदला म्हणून स्वर्ग अर्थात जन्नत मिळते. याचा सरळ अर्थ आहे कि मानवी जीवनामध्ये संयम बाळगणे खूप गरजेचे आहे. थोडासा राग अर्थाचा अनर्थ करून टाकतो. रागाच्या भरात अनेक न घडणाऱ्या घटना घडून जातात. नंतर पश्चाताप करण्याशिवाय काही शिल्लक राहत नाही. म्हणून किती जरी कठीण प्रसंग आपल्यासमोर आला तरी माणसाने आपला संयम ढळू देऊ नये. अनेक वेळा समोरच्या व्यक्तीचा संयम विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. याला काड्या करणे असे म्हटले जाते. परंतु समजूतदार व्यक्ती अशा प्रसंगांना धीरोदात्तपणे संयमाने सामोरे जाते. संयम हा इस्लाम धर्माचा स्थायीभाव आहे. पैगंबरांनी सुद्धा संयमाने वागण्याबाबत शिकवण दिली आहे. कुरआनमध्ये म्हटले आहे की, अल्लाह सब्र करनेवालो के साथ है. म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी आपला संयम ढळू देऊ नये. शेवटी सत्य हे सत्य असतं. विजय देखील सत्याचाच होतो असा आजपर्यंतचा जगाचा इतिहास सांगतो.
सध्या आपण कोरोनाला सामोरे जात आहोत. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. शासन त्याला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करीत आहेत. आपली आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस यासाठी झटत आहे. आरोग्य विभागाच्या अनेक सहकाऱ्यांना सुद्धा यामध्ये आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. परंतु हे अस्मानी संकट आहे. मानवी संकटाचा मुकाबला केला जाऊ शकतो. परंतु देवा कडून आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याची ताकत माणसात अद्याप तरी नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. तेव्हा रमजान महिन्याच्या पवित्र पर्वात सर्वांनी अल्लाहकडे मनोभावे दुआ करावी आणि रमजान संपता-संपता कोरोना चे संकट सुद्धा गेले पाहिजे यासाठी ईश्वराकडे याचना करावी . तो सगळ्या जगाचा स्वामी, पर्वत, समुद्राचा धनी,जीवन आणि मृत्यूचा मालक,परमदयाळू असा परमेश्वर निश्चितपणे आपल्या भक्तांचा अंत न पाहता हे संकट संपवेल. शेवटी त्याच्या पॉवर ची झलक त्याने दाखवलेली आहे.एका अतिशय छोट्या विषाणुपुढे हे जग बंद झाले आहे. यातून फक्त तोच वाचवू शकतो. त्यासाठी सर्वांनी त्याचीच प्रार्थना करावी . (क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*९२२६४०८०८२*

No comments:

Post a Comment