Thursday, April 23, 2020

पाठिवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा...


पाठिवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा...


 "भावबंधाची फलश्रुती"

        काल रामवाडी परिसरात ठरलेल्या यादी प्रमाणे गरजू कुटूंबाना शिधा किट वाटप करत असताना, गणेश वाघमारे या लाभार्थीच्या घरापर्यंत किट देण्यासाठी पोहचलो, तेव्हा ते म्हणाले, "सर मला नका देवू आज, तुम्ही...तुम्ही चलाच माझ्या सोबत" हाताला धरुनच एका घरी घेऊन गेले. ते सरळ अर्चना किरण शिंदे हिच्या घरी. घर असं की चारी बाजूंने फाटके फुटके पत्रे लावलेले. घरात पूरुषाचा मागमुसही नव्हता. चुल म्हणुन समोर तीन विटा मांडलेल्या. एक जर्मनचा डबा, डब्यात ओंजळ दिड ओंजळ बाजरिचं पिठ भाकरीच, रिकामं टोपल आणि घरात निरागसपणे खेळणारे तीन चिमुकले. एक चार वर्षांची मुकी मुलगी कल्याणी, दुसरा पण मुका मुलगा शौर्य दोन वर्षांचा व तिसरी मुलगी सावित्री सहा महिन्यांची.      अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षीच घरच्यांनी अर्चनाचे लग्न, आत्याचा मुलगा किरण सोबत लावून दिलं. माहेर रामवाडी अहमदनगर व सासर आंबेडकर नगर, सोलापूर. भातुकलीचा खेळ खेळण्याच्या वयातच तिच्यावर हा प्रसंग ओढावला, एकाच रात्रीतुन कुमारी अर्चना आता कमी वेळेतच सौ.अर्चना झाली होती. तिने पण कोणतीही आडकाठी न आणता त्या नवीन कुटुंबाला मोठ्या मनाने स्वीकारले. किरण हा नदीवर वाळू चाळण्याचे काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. या शिंदे दाम्पत्याना तीन मुलं झालेली. सगळं काही सुरळीत चालू असताना चार महिन्यांपूर्वी पतीला अचानक उलठ्या व जुलाब झाले म्हणुन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले व त्यातच त्याचा अवघ्या वयाच्या २५ व्या वर्षी अंत झाला..

 "कहते हैं की छोड़ने वाले छोड़ जाते हैं, मुकाम कोई भी हो...पर निभाने वाले, निभा ही जाते हैं, चाहे हालात कैसे भी हो" .... 

अर्चनावर दुःखाचा डोंगरच कोसळला. ती आता वयाच्या 22 व्या वर्षी सौ वरून श्रीमती झाली, तरीही विधवा अर्चना, त्या चिमुर्ड्या मुलांकडे पाहुन, दुखातून स्वतः ला सावरून, न डगमगता सोलापुरात पतीच्या झोपडीत आपल्या तीन चिमुकल्यांना घेऊन खंबीरपणे वाटेल ते काम करुण कसंबसं जगत होती. पण नियतिला हेही मान्य नसावं. तीन महिन्यांपूर्वी तिच्या झोपडीलाही आग लागली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सगळं, अगदी सगळं जळुन बेचिराख झालं होतं. त्यात अर्चनाची सर्व महत्वाचे कागदपत्रही जळाली होती. हे रामवाडीत राहणार्या आई-वडिलांना समजलं तेव्हा त्यांनी तडक सोलापुरला जाऊन अर्चना व तिच्या तीन मुलांना अंगावरच्या कपडयांवरच घेऊन रामवाडीत आणलं. एक पत्र्याची छोटीशी खोली हजार रुपये प्रमाणे भाड्यानं घेऊन दीली. "जमेल तसं जग पोरी" असं सांगितलं. कारण आई-वडिलांची परिस्थितिही यापेक्षा वेगळी नव्हती. मला एकच प्रश्न मनात सतत घुटमळत होता कसं जगावं, काय करावं या तीन लेकरांच्या आईनं. पण एवढं सगळे प्रसंग बेतलेले असतानाही, ती याच्या त्याच्या कडुन मागुन, जमेल तसं आपल्या तीन लेकरांचं व नंतर जमलंच तर स्वत:च पोट सन्मानाने भरत होती.    पण नियतीला हेही मान्य नसावं. म्हणतात ना हेही नसावे थोडके. अचानक करोना म्हणजेच (Covid-19) या विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला. आणि भारत सरकारने तर एकच उपाय राबवला. लॉक डाउन (१००% बंद).     पण या करोनाच्या लढाईमध्ये गणेशभाऊ मुळे एका शुर मातेचे दर्शन व्हावे हे आमचे भाग्यच समजतो!गणेश भाऊ जो आपल्या दारावर आलेले अन्न नाकारतो आणि या मातेला आगोदर दया हे ठामपणे सांगतो... हे भारतीय संस्कार रुजलेले, मला या गरीब झोपड़पट्टी मध्ये दिसतात...."ख़ुद मझधार में होकर भी    जो औरों का साहिल होता है...       ईश्वर जिम्मेदारी उसी को देता हैं,          जो निभाने के क़ाबिल होता है"... अर्चनाताईची भेट बालभवन कार्यकर्त्यांशी आता झाली होती. आणि गरजवंताच्या मदतीला धावून जाणार नाहीत ते बालभवन स्नेहालयचे कार्यकर्ते कसले? अर्चना गरजुवंत नव्हती तर अति-गरजुवंत होती. नाव यादीमध्ये नव्हतं. त्यामुळे हनिफ सरांना दोन ज्यादा शिधा किटची मागणी केली, तिच्या हाती ते सुपूर्द केले. स्नेहालयचे अध्यक्ष संजय गूगले सरानी अर्चनाच्या मोठ्या मुलीचे येथून पुढील सर्व शिक्षणाची जवाबदारीही उचलली,  त्यानंतर बालभवन समन्वयक रजिया दफेदार यांनी Excise department मार्फत मिळालेलं मोठं शिधा किटसुद्धा ही अर्चनाताईला देऊ केलं. तिला खुपच आनंद झाला. "माझ्या लेकारांचा प्रवेश मी बालभवनमध्ये करणार आणि तुमच्या सारख घडविनार आहे" हे  वाक्य म्हणजे आमच्या कामाची फलश्रुति आम्ही समजतो. "दादा, ताई तुम्ही खूप चांगले आहात, तुम्हीच माझे खरे भावबंध आहात, माझ्या अनाथ पोरांची, लई दुवा लागेल तुम्हाला."    या सर्व प्रसंगाच्या दरम्यान एक वेगळीच चमक आणि धमक अर्चनाताईच्या डोळ्यात दिसली. कीतीही कठीण संकट आलं, कितीही मोठा प्रसंग बेतला तरी कदापी हार मानायची नाही."रडायचं नाही लढायचं" हा दृढ निश्चय दिसला.      सलाम त्या मातेला... सलाम तिच्या जिद्दीला!आणि सलाम तिच्या पोटी जन्म घेतलेल्या व कठीण प्रसंगातही तिची सावली बनून राहणाऱ्या तीन लेकरांना!     मला वि.वां ची कणा कवितेची ओळ आठवतेय... 

     आग माऊली पाहुणी आली,          

      होतं नव्हतं सगळं नेल, 

     मोडून पडला संसार तरी,               

     मोडला नाही कणा,

     पाठिवरती हात ठेवून,

     फक्त लढ म्हणा...    

        अर्चनाताईलाही गरज आहे फक्त लढ म्हणनाऱ्या ची. आणि ते काम बालभवन स्नेहालय कार्यकर्ते व दाते समर्थपणे पार पाडतील. यात तीळमात्र शंका नाही.

विक्रम भगत

शिक्षक,क्षितिज बालभवन, रामवाड़ी.

No comments:

Post a Comment